मुंबई : गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांना घरचे जेवण मिळावे यासाठी मुंबईतील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. करोनाबाधित रुग्णांना अशक्तपणामुळे जेवण बनवणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबांपुढे रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बाधित रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सकस अन्न देण्याच्या उद्देशाने या संस्था काम करीत आहेत.

सौम्य लक्षणे आढळणाऱ्या करोनाबाधित रुग्णांचे घरीच विलगीकरण केले जात आहे; परंतु अशक्तपणामुळे अनेक रुग्णांना बाहेरील जेवणावर अवलंबून राहावे लागते आहे. शिवाय बाधित रुग्णांना घरपोच सेवा देण्यास बऱ्याच ठिकाणी नकार दिला जातो. त्यात विलगीकरणात असलेल्या वृद्ध आणि विद्यार्थी वर्गालाही जेवणासाठी अडचणी येत आहेत. या गोष्टींचा विचार करून दहिसर येथील समस्त महाजन संस्थेने दहिसर, कांदिवली, बोरिवली परिसरांतील गृहविलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांना घरपोच जेवण देण्याचा संकल्प सोडला आहे. समाजमाध्यमांच्या आधारे बाधित रुग्णापर्यंत पोहोचून त्यांच्यासह त्यांच्या परिवारालाही जेवण दिले जाते.

‘दिवसाला जवळपास ५०० हून अधिक लोकांना आम्ही जेवणाचा पुरवठा करतो. ६ एप्रिलपासून सुरू केलेल्या या उपक्रमात आजवर नऊ हजारांहून अधिक लोकांना जेवणाचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये चपाती, दोन भाज्या, भात आणि एक गोड पदार्थ पुरविले जाते. करोनाकाळात लोकांना सकस अन्न देण्यासाठी त्यात कोणते जिन्नस असावे याचा विचार करून आम्ही जेवण तयार करतो,’ असे समस्त महाजन संस्थेचे सदस्य परेश शहा यांनी सांगितले.

मालाड आणि गोरेगाव परिसरांत माय ग्रीन सोसायटी या संस्थेतर्फेही अशीच सेवा दिली जाते. ‘जास्तीत जास्त लोकांना घरचे जेवण मिळावे यासाठी आम्ही अनेक संस्थांशी समन्वय साधला आहे. केवळ मालाडच नाही तर मुंबईभरात असे मोफत जेवण देण्याचा आमचा मानस आहे असे गोपाळ रायठठ्ठा म्हणाले.