पनवेलचे राजकारण खारघरच्या टोलनाक्यावरून पेटले असताना शिव-पनवेल मार्गावर टोलनाक्याचा दांडा शनिवारी दुपारपासून आडवा करून या मार्गावरून जाणारी वाहने काही वेळेसाठी थांबून पुढे सरकत होती. यावेळी कोणतीही टोलवसुली करण्यात आली नाही. मात्र टोलचा दांडा पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच हा टोल सुरू होईल, यावर शिक्कामोर्तब झाले. चौकशीअंती टोलनाक्यावरील वाहने रोखणारा दांडा व्यवस्थित काम करतो का, मिनिटांत किती वाहने येथून जातात याची रंगीत तालीम सुरू असल्याचे टोलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक वाहनचालक कोण..
मुख्यमंत्र्यांनी खारघरच्या टोलबाबत स्थापन केलेल्या समितीने पाच गावातील स्थानिक वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव दिल्याचे समजते. मात्र या प्रस्तावाबाबत त्या पाच गावांच्या हद्दीतील सिडको वसाहतींमधील वाहनांचा समावेशाविषयी साशंकता आहे. पनवेल परिवहन क्षेत्रामध्ये पनवेल, उरण व इतर तालुके समाविष्ट होतात. याचदरम्यान शेकापने या टोलमधून स्थानिकांना सूट मिळवून देऊ, असे आश्वासन मतदारांना दिले आहे. या विविध प्रस्ताव, मागणी आणि आश्वासनांमध्ये पनवेलचे स्थानिक वाहनचालक कोण याची व्याख्या स्पष्ट नसल्याने सर्वाचा गोंधळ उडाला आहे.