अँटिलिया स्फोटकं प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता सचिन वाझेचा साथीदार असलेल्या पोलीस अधिकारी रियाझ काझी याला एनआयएने अटक केली आहे. स्फोटकं ठेवण्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्याने ही अटक करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचं एनआयएच्या चौकशीत समोर आलं आहे. एनआयएनं यापूर्वीही पोलीस अधिकारी रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं होतं. मात्र त्यावेळेस त्याने एनआयएच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास टाळाटाळ केली होती. रविवारी पुन्हा एकदा चौकशीला बोलवल्यानंतर एनआयएने काझीला अटक केली आहे. गेल्याच महिन्यात रियाझ काझीला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

अँटिलियाबाहेरील स्फोटकं प्रकरण अंगाशी येतंय हे पाहून रियाझ काझी विक्रोळीत गाड्यांचे नंबर प्लेट बनवण्याऱ्या दुकानात गेला. काझी दुकानात जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता, हे मात्र त्याच्या लक्षात आलं नाही. त्याला फक्त दुकानातील सीसीटीव्ही आणि फुटेज ताब्यात हवं होतं. दुकानात गेल्यानंतर त्याने मालकाशी संवाद साधला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दुकानातील डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर आणि संगणक सोबत घेऊन गेला. त्याचबरोबर वाझेच्या शेजाऱ्याकडील सीसीटीव्ही फुटेजही घेऊन गेला होता.

“आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील, तर…”

अँटिलिया स्फोटकं प्रकरणी एनआयएने सचिन वाझेला १३ मार्चला अटक केली आहे. आता त्याला मदत केल्याप्रकरणी रियाझ काझीला अटक केली आहे. काझीला कोर्टात हजर केलं असता १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन क्विंटल जिलेबी, १०५० सामोसे पोलिसांनी केले जप्त; कारण…

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आता या कटात आणखी कोण कोण सामील आहे, याचा एनआयए कसून तपास करत आहे.