अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं आता स्पष्ट केलं आहे. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचं देखील एनआयएनं सांगितलं आहे. या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

दरम्यानच्या काळात अँटिलियाबाहेरचं एक सीसीटीव्ही फूटेज एनआयएनं तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायर होऊ लागलं. सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे. मात्र, आता हे पीपीई किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलं आहे. तसेच, ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे, असं देखील एनआयएनं म्हटलं आहे. आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचं देखील एनआयएनं सांगितलं आहे.

 

दरम्यान, एनआयएनं सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला होता. मात्र, या लॅपटॉपमधील सर्व डाटा आधीच डिलीट केल्याचं एनआयएच्या निष्पन्न झालं आहे. तसेच, सचिन वाझे यांच्याकडे चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईल फोनची मागणी केली असता तो हरवल्याचं त्यांनी सांगितलं. पण तो हरवला नसून त्यांनी कुठेतरी फेकून दिला आहे, असं देखील एनआयएचं म्हणणं आहे.

“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?”

एनआयएनं एक मर्सिडिज कार देखील ताब्यात घेतली असून त्याचा देखील तपास सध्या सुरू आहे. या कारमध्ये एनआयएला कॅश आणि नोटा मोजण्याचं मशिन सापडलं आहे. ही कार सचिन वाझे यांनी वापरली असल्याचा एनआयएला संशय असून त्या दिशेनं तपास सुरू असतानाच आता या कारसोबत काही भाजपा पदाधिकाऱ्यांचे फोटो सापडल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.