राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने सचिन वाझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. आठ तास चाललेल्या शोधमोहिमेत वाझे यांच्या कार्यालयातून दोन डीव्हीआर (सीसीटीव्ही चित्रण साठविण्याचे यंत्र), लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत.

वाझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात घेतलेल्या ‘डीव्हीआर’ मिळवण्यासाठी हा छापा टाकण्यात आला होता. एनआयएने जप्त केलेले डीव्हीआर वाझे यांचे वास्तव्य असलेल्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेचे आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

वाझे राहात असलेल्या गृहनिर्माण संस्थेसह अन्य भागांतील डीव्हीआर त्यांच्या पथकातील सहायक निरीक्षक रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. संस्था पदाधिकाऱ्यांना त्यांच्याच स्वाक्षरीने फौजदारी दंड संहितेतील ४१ कलमानुसार नोटीस बजावण्यात आली होती. काझी यांचा संशयास्पद वावर अनेक ठिकाणी आढळल्याने एनआयए त्यांच्याकडे गेल्या तीन दिवसांपासून चौकशी करत आहे.

तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून या क्षणी कोणतीही माहिती देणे उचित ठरणार नाही, असे एनआयए प्रवक्त्या जया रॉय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मुद्देमाल वहीत नोंद नाही

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके, धमकीची चिठ्ठी सापडल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) प्रमुख वाझे यांच्यावर सोपविण्यात आली. सीआययूसह गुन्हे शाखेच्या विविध कक्षांतील अधिकाऱ्यांना तपास पथकात सामावून घेण्यात आले. या पथकाने वाझे यांच्या सूचनेवरून तपासाच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यातील निवासी, व्यावसायिक आस्थापनांचे डीव्हीआर ताब्यात घेतले. तपासासाठी जप्त केलेल्या या यंत्रांची मुद्देमाल यादीत नोंद करण्यात आली नव्हती, अशी माहिती एनआयएला मिळाली. स्वत:च्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतल्याने अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ चोरी झाली नसून ती सुमारे आठ दिवस वाझे यांच्याच ताब्यात होती, असा संशय निर्माण झाला. या डीव्हीआरमधील चित्रणाबाबत फेरफार आढळल्यास तो आरोपींविरोधात परिस्थितीजन्य पुरावा ठरू शकेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सात अधिकाऱ्यांची चौकशी

वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

वाझेंकडून वरिष्ठांची दिशाभूल?

अंबानी धमकी प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप, मृत व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाझे यांच्याकडे विचारणा केली. मात्र हे आरोप खोटे असून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न असल्याचे वाझे यांनी वरिष्ठांना सांगितले, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

मर्सिडीजमधून रोकड हस्तगत

दक्षिण मुंबईतून जप्त करून पेडर रोड येथील कार्यालयात आणलेल्या मर्सिडीज गाडीची तपासणी एनआयए अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास केली. या वेळी सचिन वाझे यांनाही कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले होते. या गाडीत रोख रक्कम, कपडे, कागदपत्रे आढळली. रोख रक्कम एनआयए अधिकाऱ्यांनी वाझे यांच्यासमोरच मोजली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गाडीवरील नोंदणी क्रमांक धुळे येथील एका व्यक्तीच्या मर्सिडीज गाडीचा आहे. समाजमाध्यमांवर या व्यक्तीचे गाडीसोबतचे छायाचित्रही आढळले आहे. जप्त केलेली काळ्या रंगाची मर्सिडीज वाझे वापरत होते. या कारमधून पाच लाखांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, काही कपडे आणि स्कॉर्पिओच्या नोंदणी क्रमांक पाट्या आदी हस्तगत करण्यात आले. ही कार कोणाची याबाबत तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीपीई किटमधील व्यक्ती कोण याबाबतही तपास सुरू आहे, असे एनआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.