२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र
एटीएसचे माजी प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या २००८ सालच्या मालेगाव स्फोटाचा तपास योग्य असल्याचा आतापर्यंत दावा करणाऱ्या ‘एनआयए’ने अचानक ‘घूमजाव’ करत या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हा तपास चुकीचा असल्याचा दावा केला आहे. स्फोटाचे धागेदोरे सापडत नव्हते म्हणून एटीएसने आरोपींचा अतोनात छळ केला व त्यांच्याकडून पाहिजे तसा कबुलीजबाब नोंदवून घेतला. एवढेच नव्हे, तर आरोपींवर कठोर असा ‘मोक्का’ही लावण्यात आल्याचा आरोप ‘एनआयए’ने केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात ‘एनआयए’ने एटीएसच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवत तो चुकीचा असल्याचा दावा केला आहे.
प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार बेपत्ता झाल्यानंतरच एटीएसचा तपास हा संशयास्पद असल्याचे उघड झाल्याचेही ‘एनआयए’ने आरोपपत्रात म्हटले आहे. सीबीआयने या साक्षीदाराच्या अचानक बेपत्ता होण्याची कारणे स्पष्ट करताना एटीएसच्या एका अधिकाऱ्याबाबत तपासात शेरा मारला होता, याकडेही ‘एनआयए’ने लक्ष वेधले आहे. शिवाय राकेश धावडे याच्यावर परभणी आणि जालना येथील बॉम्बस्फोटप्रकरणी दाखल गुन्ह्य़ांचा आधार घेत एटीएसने या स्फोटप्रकरणी ‘मोक्का’ लावला. ‘मोक्का’ लावण्यासाठा मोठा खटाटोप करण्यात आल्याचा दावाही ‘एनआयए’ने केला आहे. परभणी स्फोटप्रकरणी धावडे याच्यावर २००३ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
जालना बॉम्बस्फोटप्रकरणीही धावडेविरुद्ध पहिल्यांदा २००६ मध्ये तर मालेगाव स्फोटप्रकरणी अटक केल्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच १५ नोव्हेंबर २००८ रोजी त्याच्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आला. या दोन बाबींकडे लक्ष वेधत ‘एनआयए’ने एटीएसने ‘मोक्का’ लावण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मालेगावप्रकरणी धावडेला २ नोव्हेंबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती आणि चार दिवसांनंतर एटीएसचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुखविंदर सिंह यांनी औरंगाबाद एटीएसच्या पोलीस निरीक्षकाला पत्र पाठवून त्याला सांगितले की, धावडे याने परभणी स्फोटातील आरोपींसाठी २००३ मध्ये सिंहगड येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याला अटक करा आणि तपास करा, असे आदेश दिले. मालेगाव स्फोटाचा तपास अधिकारी मोहन कुलकर्णी यांनीही जालनाच्या गुन्हे विभाग निरीक्षकाला पत्र पाठवून धावडे याने जालना स्फोटातील आरोपींसाठी स्फोटकांचे प्रक्षिक्षण शिबीर आयोजित केल्याचे उघड केले आहे, असे कळवले व त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अटक करणे आणि आरोपपत्र दाखल करण्यादरम्यान एटीएसला पुरावे गोळा करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. तर ही सगळी कसरत मालेगाव स्फोटातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्यासाठी होती, असा दावाही ‘एनआयए’ने केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट, अन्य आरोपींवरील मोक्का वगळला

सरकारी वकिलांच्या अपरोक्ष आरोपपत्र
* मालेगाव स्फोटप्रकरणी ‘एनआयए’ने शुक्रवारी तडकाफडकी पुरवणी दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, सरकारच्या दबावामुळे ‘एनआयए’ने भूमिका बदलल्याचे म्हटले जात आहे. त्यात भर म्हणून की काय या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनीही खटला सोडण्याची धमकी ‘एनआयए’ला दिली.
* त्यांच्या अपरोक्ष ‘एनआयए’ने आरोपपत्र दाखल केल्याने संतापलेल्या रसाळ यांनी खटला सोडण्याची धमकी दिली. मात्र ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सर्व काही ठीक असल्याचे सांगत त्यांनीही ‘घूमजाव’ केले. गुरुवारी आपल्याशी ‘एनआयए’ने संपर्क साधला व अर्ज करून महिनाअखेरीस पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे न्यायालयाला कळवण्यास सांगितले.

मालेगावप्रकरणी आठही आरोपी मुक्त

साध्वीची सुटका, पुरोहित आत का?
बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल ही साध्वी प्रज्ञा सिंह वापरायची. मात्र दोन साक्षीदारांच्या साक्षीतून नंतर ती मोटारसायकल या प्रकरणातील फरारी आरोपी रामचंद्र कालसंगरा यांच्या ताब्यात होती आणि नंतर तोच ती वापरत होता. त्यामुळे साध्वी आणि अन्य पाच आरोपींचा याप्रकरणी काही सहभाग होता याचा पुरावा पुढे आलेला नाही, असा दावा ‘एनआयए’ने आरोपपत्रात केला आहे. तसेच साध्वी व अन्य पाच आरोपींना आरोपमुक्त केले आहे. पुरोहितवरील ‘मोक्का’ हटवून ‘एनआयए’ने त्याच्यावर सौम्य आरोप ठेवले आहेत. स्फोटाच्या कटाचा तो मुख्य सूत्रधार असून लष्करी अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही नियमांना बगल देत २००६ पासून तो ‘अभिनव भारत’साठी काम करत होता. कटाच्या संभाषणाबाबतच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात आरोपींच्या आवाजावर शिक्कामोर्तब केले आहे. स्फोट घडवल्यानंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप होता आणि ते त्यांच्या वर्तणुकीतून दिसत होते. साध्वी प्रज्ञाला अटक करण्यात आल्यानंतर पुरोहितने आरोपी समीर कुलकर्णीला संदेश पाठवून एटीएस त्याच्या घरातसुद्धा घुसल्याचे कळवले होते व फोनमधून संपर्क क्रमांक मिटवले होते. त्यातून त्याचा या स्फोटात सहभाग आहे हे स्पष्ट होते, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

‘एनआयए’वरील रोहिणी सालियान यांचा आरोप खरा?
मालेगाव स्फोटांतील आरोपींबाबत मवाळ भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट या प्रकरणातील विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान काही महिन्यांपूर्वी केला होता. त्या वेळेस सालियान यांचा आरोप बिनबुडाचा आहे. असा दावा ‘एनआयए’ने केला होता. परंतु शुक्रवारी ‘एनआयए’ सालियान यांचा आरोप कसा खरा होता हेच पुरवणी आरोपपत्रातून काही आरोपींना आरोपमुक्त करून, तर काहींवरील आरोपांचे स्वरूप सौम्य करून सिद्ध केले.

रामचंद्र कालसंगरा आणि संदीप डांगे जाळ्यात नाहीच
मालेगाव स्फोटातील आरोपी रामचंद्र कालसंगरा आणि संदीप डांगे दोघेही अद्याप फरारी असून ते ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. कालसंगरा हा शाजापूर तालुक्यातील, तर डांगे हा मध्य प्रदेश येथील इंदूर येथील रहिवासी आहे. मालेगाव स्फोटानंतर हे दोघेही फरारी झाले आणि ‘एनआयए’ने त्यांची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.