पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुकेश अंबानी धमकी प्रकरणात वापरलेली पांढरी इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून (एमटी) रविवारी पहाटे जप्त केली. ही गाडी शासकीय असून, वाझे यांच्या पथकात होती, असे स्पष्ट झाले. गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या गाडीचा कसोशीने शोध घेतला जात होता.

आणखी वाचा- “वाझे यांनी भाजपावाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास बेड्या ठोकल्या, तेव्हा…”

गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) या अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख असलेल्या वाझे यांना शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ‘एनआयए’ने अटक केली. अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला. ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आलं होतं.

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

दरम्यान, आता एनआयएने स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किटमध्ये असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. जिलेटीन असलेली गाडी पार्क करण्यात आली, त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? पीपीई किटमध्ये वाझे होते की दुसरी व्यक्ती होती? या प्रश्नांच्या अनुषंगाने एनआयएने तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा- दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

वाझेंच्या सहकाऱ्यांकडे चौकशी

‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी वाझे यांच्याबरोबर सीआययू कक्षात कार्यरत असलेल्या रियाज काझी या अधिकाऱ्याकडे दिवसभर चौकशी केली. याशिवाय काही आजी-माजी अधिकाऱ्यांकडेही चौकशी केली जाईल, असे संकेत दिलेले आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणारे, वापरणारे अशी ओळख असलेल्या वाझे यांचे मोबाइल, लॅपटॉपसह अन्य उपकरणे ‘एनआयए’ने तपासासाठी ताब्यात घेतली आहेत.