राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) पथकाने सोमवारी दुपारी व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाची भेट घेतली. एनआयएकडून उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणासह मनसुख यांच्या हत्येचाही तपास सुरू आहे. पथकातील वरिष्ठ अधिकारी दुपारी ठाणे येथील मनसुख यांच्या निवासस्थानी आले. कु टुंबाशी चर्चा करून, आतापर्यंत के लेल्या तपासाची माहिती देऊन हे पथक परतले. ५ मर्चला मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे सापडला होता. आदल्या दिवशी तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदर येथे जातो, असे सांगून त्यांनी घर सोडले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख यांची होती. या प्रकरणी एनआयएने निलंबीत सहायक निरीक्षक सचिन वाझे, रियाज काझी, शिपाई विनायक शिंदे आणि नरेश गोर या चार आरोपींना अटक केली. सध्या ते न्यायायलयीन कोठडीत आहेत. मनसुख यांच्या हत्येत वाझे, शिंदे यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा, असा संशय एनआयएला आहे. वाझे यांच्याबाबत हिरेन कुटुंबाने सर्वप्रथम संशय व्यक्त केला होता.