03 June 2020

News Flash

 ‘आफ्रिकन बियां’मध्ये लाखोंची फसवणूक

कोणतीही खातरजमा न करता कोणतीही खातरजमा न करता भांडुपमधील तरुणाने बियांसाठी होकार भरला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईसह देशभरात अनेकांना गंडा; नायजेरिअन घोटाळेबाजांच्या टोळ्या सक्रिय

आरसीएफ कंपनीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने मित्राकडून तब्बल ५० लाखांचे कर्ज घेऊन ७७ लाख गुंतवले.. डोंबिवलीतल्या एका महिलेने घर विकून ५५ लाख गुंतवले.. पंजाबमधल्या एका डॉक्टरने तर सारी मिळकत गोळा करून ९८ लाख ओतले.. या तिघांप्रमाणे आफ्रिकन बियांच्या विक्रीतून घरबसल्या लाखो रुपये कमावण्याच्या मधाळ आमिषाला बळी पडून इराणमध्ये नोकरी करणाऱ्या कोलकात्याच्या उच्चशिक्षित तरुणानेही ६५ लाख गुंतवले.. आफ्रिकन बियांच्या व्यवसायात लाखो रुपये कमावण्याची स्वप्ने पाहणारे हे सगळेच फसले आहेत. कारण त्यांच्याकडून पैसे घेणारे बेपत्ता झाले आहेत. आता गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी या चौघांनाही पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत.

गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये आफ्रिकन बिया किंवा हर्बल सीड्स विक्रीच्या नावाखाली नायजेरिअन घोटाळेबाजांनी देशभरातल्या अनेकांना कोटय़वधींचा गंडा घातला आहे. मधल्या काळात हे वादळ निवले असे वाटत होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी भांडुप पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला हर्बल सीड्सच्या नावाखाली फसवणाऱ्या नायजेरिअन तरुण आणि त्याच्या भारतीय पत्नीला दिल्लीतून अटक केली. महिन्याकाठी एक लाख रुपये कमावणाऱ्या या तरुणाने सहा महिन्यांत एका अनोळखी परदेशी तरुणीसोबत फेसबुकवर झालेल्या ओळखीतून १६ लाख रुपये गुंतवले होते. परंतु, आता ही सर्वच रक्कम बुडाल्यात जमा आहे. मुख्य म्हणजे झटपट पैसे कमावण्याचे आमिषच नव्हे तर या स्वप्नाची भुरळ पाडणाऱ्या सुंदर परदेशी तरुणीसोबत ‘सर्वप्रकार’चे संबंध जोडण्याचा मोह फसवणुकीला कारणीभूत ठरतो आहे, हे या प्रकरणांमधून पोलिसांना आढळून आले.

बडे अधिकारीही लक्ष्य

ज्या व्यक्तीला कधी पाहिलेले नाही, निव्वळ दूरध्वनीवरून किंवा समाजमाध्यमाद्वारे बोलण्यातून मिळालेल्या जुजबी माहितीच्या आधारे लाखोंचा व्यवसाय, गुंतवणूक हे कसे शक्य आहे, हाच प्रश्न पोलीस फसवणूक झालेल्या प्रत्येकाला विचारतात. प्रत्यक्षात बियांआधी अस्तित्वात नसलेल्या रसायनांच्या नावे फसवणूक सुरू होती. यात ओएनजीसीतील तज्ज्ञ अधिकारीही लाखो रुपयांना फसल्याचे उदाहरण आहे. याशिवाय केंद्रीय यंत्रणेत उपायुक्त दर्जाचा निवृत्त अधिकारीही नायजेरिअन घोटाळेबाजांच्या मधाळ बोलण्याला फसल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बियांमध्ये फसवणुकीचे बीज ;  ऑनलाइन जाहिरातीपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

आफ्रिकन बिया घोटाळ्याची सुरूवात फेसबुकवर अनोळखी तरुणीकडून आलेल्या मैत्रीच्या विनंतीला, अनोळखी नंबरवरून आलेल्या लघुसंदेशाला वा घरबसल्या पैसे कमवा, अशा ऑनलाइन जाहिरातीला दिलेल्या प्रतिसादाने सुरू होते. संवाद साधणाऱ्या मुलीच असल्याने त्यांच्या मधाळ बोलण्यामुळे बहुतांश पुरुष यात सहजरीत्या फशी पडतात.

भांडुप पोलिसांनी सखोल तांत्रिक तपास करून अखेर दिल्लीतून एननाग्बो ओराजीऊका हा नायजेरियन तरुण आणि निहारीका या त्याच्या भारतीय महिलेला अटक केली. मर्सी जॉन या नावाने दोघांनी बनावट फेसबुक  खाते तयार केले होते. हे दोघेच मर्सी म्हणून तरुणांशी संपर्क साधत होते.

मर्सीचे ‘मधाचे बोट’

फसवणूक झालेल्या भांडुपच्या तरुणाला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इंग्लंडमधून मर्सी जॉन नावाच्या तरुणीने फेसबुकवर  मैत्रीची विनंती केली. ती विनंती तरुणाने स्वीकारली. दोघांमधील फेसबुकवरील संवाद हळूहळू व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झाले. काही दिवस समाजमाध्यमांद्वारे सतत संपर्कात राहिल्यानंतर मर्सीने ती इंग्लंडमधील एका औषध कंपनीत मोठय़ा हुद्दयावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यांची कंपनी कर्करोग, एड्स या व्याधींवर उपायकारक औषध तयार करीत असल्याचे सांगितले. हे औषध तयार करण्यासाठी आफ्रिकेतील बिया आवश्यक आहेत; मात्र त्याचा पुरवठादार अमेरिकेत स्थायिक असल्याने सध्या औषध निर्मितीचे प्रमाण घटले आहे, असे तिने या तरुणाला सांगितले. ‘भारतात अशा बियांचा एक पुरवठादार आहे. त्याला मी ओळखते. जर त्याच्याकडून बिया खरेदी करून तुम्ही आमच्या कंपनीला विकाल तर दुप्पट फायदा होऊ शकेल,’ अशी युक्ती तिने या तरुणाला दिली.

कोणतीही खातरजमा न करता कोणतीही खातरजमा न करता भांडुपमधील तरुणाने बियांसाठी होकार भरला.  ठरल्याप्रमाणे मर्सीने भारतातील वितरकाचा दूरध्वनी क्रमांक पुरवला. त्यानंतर कंपनीच्या संचालकाशी बोलणे करून दिले. त्यावर संचालकाने बियांचे नमुने तयार असतील तर आमचे अधिकारी भारतात येतील, प्रयोग शाळेत तपासून दर्जा ठरवतील आणि पुढील ऑर्डर देतील, असे कळवले.

तरुणाने तातडीने अडीच लाख रुपये भरून भारतीय पुरवठादाराकडून बिया मागवल्या. ठरल्याप्रमाणे कंपनी अधिकाऱ्याने (नायजेरिय तरुण) वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकन वकीलातीजवळ तरुणाची भेट घेतली. त्याने नमुना प्रयोगशाळेत तपासून कळवतो, असे सांगून निरोप घेतला. काही दिवसांनी नमुना योग्य असून बिया दर्जेदार आहेत, तुम्हाला ५० पाकिटांची ऑर्डर दिली जाईल, असा निरोप कंपनीच्या संचालकाने तरुणाला पाठवला. त्यानुसार तरुणाने सुमारे दहा लाख रुपये भरून आणखी बिया मागवल्या. दहा लाख रुपये बँक खात्यात जमा झाल्यानंतर प्रथम मर्सी आणि नंतर कंपनीचे अधिकारी आणि अखेरीस बियांचा भारतीय पुरवठादार म्हणवणारी व्यक्ती गायब झाली. तरुणाला जबर धक्का बसला.

मधाळ बोलून, प्रसंगी बोलण्यातून सलगी वाढवून, लाखो रुपये झटक्यात कमावण्याचे आमीष दाखवून लक्ष्य हेरायचे. विश्वास बसावा म्हणून बोगस कंपनीचे बोगस लेटरहेड, ईमेल आयडी तयार करायचे. त्याद्वारे पुढील बोलणे करायचे. भारतीय पुरवठादाराचा मुखवटा धारण करून स्वत:च बिया पाठवायच्या. प्रयोगशाळेत नमुना चाचणीच्या नावाखाली दर्जा ठरवायचा, कोटेशन मागवायचे, ऑर्डर द्यायची आणि ती मिळवण्यासाठी पुन्हा बिया पाठवायच्या, त्यासाठी बोगस कागदपत्रांआधारे काढलेल्या बॅंक खात्यांमध्ये पैसे वळते करून घ्यायचे, पैसे मिळाले की नवे लक्ष्य शोधायचे, अशी या घोटाळेबाजांची कार्यपद्धती आहे. यासाठी वापरण्यात येणारे सीमकार्डही बोगस. संघटित  टोळीप्रमाणे हे घोटाळेबाज गुन्हा करतात. म्होरक्या एकच असतो. पण फोन करणारा, बिया पोचवणारा, पैसे काढणारा वेगळा. या कामांसाठी प्रत्येकाला ठराविक कमिशन म्हणून मिळतात.

बिया मुंबईच्या बाजारातही मिळतात

इंटरनेटवर कितीही शोधले तरी माहिती मिळणार नाही अशी नावे बियांना द्यायची. या बिया दुर्धर आजारांवर रामबाण औषध तयार करण्यासाठी आवश्यक असल्याने लाखो रुपयांना विकल्या जातात, अशी थाप मारायची. मुंबईत घडलेल्या गुन्हयांमध्ये तक्रारदाराच्या घरी ज्या बिया आल्या त्याबाबत तर त्या पौष्टीक असून त्याचे सूप आरोग्याकरिता फारच चांगले आहे, अशी बतावणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. खरेतर मुंबई किंवा आसपास राहाणारे आफ्रिकन नागरिक या बियांचा अन्नात उपयोग करतात. त्यामुळे या बिया क्रॉफर्ड मार्केट किंवा अन्य मोठया बाजारपेठांमध्ये गहू, तांदळाच्याच भावाने विकल्या जातात. पोलिसांनी जप्त केलेल्या बिया अन्न व औषध प्रशासनालयाच्या प्रयोगशाळेत, न्यायवैद्यक प्रयोग शाळांमध्ये चाचणीसाठी धाडल्या. या बिया भारतात तयार होत नाहीत, असा एकच अहवाल सगळया प्रयोगशाळांनी पोलिसांना दिला आहे.

धोक्याची सूचना धुडकावली

इराणमध्ये नोकरी करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणालाही लघुसंदेशाद्वारे घरबसल्या पैसे कमावण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. त्याने मित्रांकडून उसने पैसे घेऊन ६५ लाख रुपये गुंतवले होते. बियांचे पार्सल स्वीकारणाऱ्या त्याच्या एका मित्राने काहीतरी गडबड आहे, या बिया इतक्या महाग वाटत नाहीत, तू फसशील, अशी कल्पना तरुणाला दिली होती; मात्र तरीही त्याने पैसे गुंतवलेच. तर घरबसल्या काहीतरी व्यवसाय करावा या हेतूने ऑनलाइन शोधाशोध करताना आफ्रिकन बियांची जाहिरात पाहून आरसीएफचा माजी अधिकारी फसला. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी नायजेरिअन घोटाळेबाजांच्या म्होरक्यापासून कुरिअरने ठरलेल्या पत्त्यांवर बिया पाठवणाऱ्यांपर्यंत संपूर्ण साखळी उद्ध्वस्त  केली होती. या टोळीने महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाबपासून आसाम, मेघालयपर्यंत नऊ राज्यांमधील बँक खात्यांमध्ये पैसे स्वीकारल्याचे समोर आले होते. ज्यांनी आमिषाला बळी पडून लाखो रुपये भरले होते त्या विविध राज्यातील अनेकांना पोलिसांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटून आता यापुढे पैसे भरू नका, तुमची फसवणूक होते आहे, अशी सूचना केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2017 2:02 am

Web Title: nigerian cheated many people in the name of african herbal seeds sales
Next Stories
1 घरपोच पोषण आहार पुरवठा योजनेवर सर्वोच्च न्यायालायाचे शिक्कामोर्तब
2 गृहनिर्माण नियम दंडात कपात!
3 मुस्लीमांची काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ
Just Now!
X