राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर नाशिक, औरंगाबाद सारख्या शहारांमध्ये मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. मुंबईतील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, आता मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर, राज्यात करोनाशी संबिधत घालण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत.

”आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळतील, त्या सोसायटी सील केल्या जाणार आहे. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्यासंख्येने करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. तर, नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

दरम्यान,  येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे.

Coronavirus – राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.