दादर परिसरातील पालिका शाळांमध्ये ७ डिसेंबर रोजी विदारक दृश्य

ठिकठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्या.. पानतंबाखुच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती.. इतस्तत: पडलेला कचरा.. ६ डिसेंबर रोजी मुंबईत हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या नागरिकांचे ओखी वादळ आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खुल्या करण्यात आलेल्या दादरमधील महापालिका शाळांतील गुरुवारचे हे दृश्य. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांची या शाळांमध्ये सोय करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी या शाळांची तातडीने स्वच्छता करण्याचे भान पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना न राहिल्यामुळे या अस्वच्छ शाळांची सफाई करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाच हाती झाडू घ्यावा लागला.

ओखी वादळाचे संकट आणि मुंबईत सुरू झालेला पाऊस यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर जमलेल्या जनसमुदायाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबई महापालिकेने दादर परिसरातील ७० शाळा ६ डिसेंबर रोजी खुल्या केल्या होत्या.  मात्र, ७ डिसेंबर रोजी जेव्हा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी दाखल झाले तेव्हा येथील दृश्य किळसवाणे होते. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या पडल्या होत्या, शाळेतील सुविचारांनी सजलेल्या भिंतीवर पानतंबाखुच्या पिचकाऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कचरा तर संपूर्ण शाळेत पसरला होता. शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दादर वुलन्स मिल शाळा, सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळा आणि गोखले रोड शाळा या महापालिका शाळांत हजारो नागरिकांनी मुक्काम केला. पालिकेने याठिकाणी जेवणपाण्याची व्यवस्था केली होती. परंतु, नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. गोखले रोड शाळेत काही लोकांनी बेदरकारपणे काही वर्गाची कुलुपे तोडून तिथे मुक्काम केला. वर्गातील बाके, तकते यांची अत्यंत निष्काळाजीपणे हाताळणी करून शाळेचे बरेच नुकसान केले. सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त यापूर्वीही मुक्कामाची सोय करण्यात आली होती. परंतु, यंदा प्रथमच त्यांना नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनाचा अनुभव आला. शाळेत कुठेही मलमूत्र विसर्जन केल्याचे दिसून आले. यामुळे दुसऱ्या दिवशी दिवसभर याठिकाणी प्रचंड दरुगधी होती.

पुरेसे स्वच्छ वर्ग उपलब्ध नसल्याने गोखले रोड शाळेत २ वर्ग एकत्र बसविले होते. दादर वुलन्स मिल शाळा आणि सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळेत मात्र पालिकेने तत्परतेने माणसे पाठवून साफसफाई करून दिली.

‘पालिका शाळा या सार्वजनिक मालमत्ता असल्याने त्यांचा वापर कसाही केला तर चालतो, अशी मनोवृत्ती आहे. बाहेरगावाहून आलेल्या गोरगरिबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तांच्या वापराबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण करणेही आवश्यक आहे,’ असे मत पालिका शिक्षक संघटनेचे रमेश जोशी यांनी व्यक्त केले.

‘पुढच्या वर्षी शाळा देणार नाही’

वादळ आणि पावसाच्या पाश्र्वभूमीवर सक्ती केलेली नसतानाही पालिकेच्या सूचनेनंतर दादरची छबीलदास ही खासगी शाळा ६ डिसेंबर रोजी रात्रनिवारा म्हणून खुली करून देण्यात आली. ‘सहा डिसेंबरच्या रात्री शाळा रिकामी होईल, असे पालिकेने म्हटले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अनेकजण तेथे मुक्काम ठोकून होते,’ असे शाळेचे संचालक अरविंद पारसकर म्हणाले. तर, शाळेच्या मुख्याध्यापिका ब्लांची रॉड्रीकस म्हणाल्या,‘काही लोकांच्या बेजबाबदार वापरामुळे गुरुवारी शाळेत पाणीटंचाई जाणवली. सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या. वर्गखोल्यांची साफसफाई करताना आमची पुरती दमछाक झाली. पालिकेने लोकांची तात्पुरती सोय शाळांमध्ये करायचा निर्णय घेतला. पण बाकीची जबाबदारी शाळांवर ढकलली. त्यामुळे पुढच्या वर्षी अशी काही सूचना आली तर, आम्ही त्याला विरोध करू.’