तापमान घसरले; गारठा लवकरच आणखी वाढणार

मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ाअखेर शहरात गुलाबी थंडी दाखल झाली. गेल्या दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी घसरल्याने रात्रीचा गारठा वाढला आहे. या हंगामातील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान गेल्या दोन दिवसांत नोंदविल्याचे हवामान खात्याने सांगितले.

हुडहुडी भरवून टाकणारा आणि स्वेटर अत्यावश्यक ठरविणारा गारठा लवकरच शहरात दाखल होणार असल्याची चाहूलच यानिमित्ताने मिळाली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या आठवडय़ामध्ये राज्यात बुहतांश ठिकाणी ढगाळ स्थिती होती. त्यामुळे रात्रीची थंडी पूर्णपणे गायब झाली होती. याशिवाय दिवसभर उकाडा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने किमान आणि कमाल तापमानात घट जाणवत आहे.

सांताक्रूझ येथे सोमवारी सकाळी किमान तापमानाची नोंद असून १६.८ अंश से. झाली असून या हंगामातील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. तसेच कुलाबा येथे २० अंश से. किमान तापमान नोंदले. बोरिवली, भांडुप आणि पवई येथे १५ अंश से. इथपर्यंत किमान तापमानांची नोंद झाली आहे, तर गोरेगाव भागात याहूनही खाली तापमान घसरले आहे. वरळी, वांद्रे-कुर्ला, कांदिवली आणि मुलुंड भागांत कमाल तापमानाची नोंद ३० अंश से.हूनही कमी झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

 राज्यात काही भागांत पाऊस..

पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरावरून बाष्प येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भात ढग जमा झाले आहेत. त्यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्य़ाांमध्ये पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दुपारनंतर ढग जमा होऊन या भागात पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

थंडीभान..

शनिवारपासूनच मुंबईत किमान तापमानासह कमाल तापमानात घट सुरू झाली. रविवारीही घट कायम राहिली असून किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी कमी झाले. उत्तरेकडून येणारे शहरावरून पूर्वेकडे जात असल्याने कमाल आणि किमान तापमान घट झाली आहे. त्यामुळे सकाळच्या हवेतील गारवा वाढला आहे. मात्र दिवसभराचे तापमान कमी होईल, तेव्हा हुडहुडी भरणारी थंडी शहरात येईल, असे वेधशाळेने स्पष्ट केले.