बेस्ट, रिक्षा-टॅक्सीचालकांचे फायद्याचे गणित

मुंबई : मुंबईत सुरू होणारे रात्रजीवन (नाइटलाइफ) बार, पबचालकांबरोबरच प्रवाशांचे ५० लाखांचे उद्दिष्ट साध्य करू पाहणाऱ्या बेस्टच्या पथ्यावर पडणार आहे. बेस्टने यात आपली ध्येयप्राप्तीची संधी साधायचे ठरविले आहे. तर काळ्या-पिवळ्या टॅक्सी-रिक्षांसह मोबाइल अ‍ॅपवर आधारित खासगी टॅक्सींनाही यात वाढत्या सेवा संधी दिसत आहे. रेल्वेने प्रशासनाने मात्र देखभाल-दुरुस्ती, कमी मनुष्यबळामुळे सध्याच्या सेवेत भर टाकणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

रात्रजीवन सुरू झाल्यास सार्वजनिक वाहतुकीची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडील ३,४०० बसगाडय़ांमध्ये वातानुकूलित गाडय़ांचाही समावेश आहे. तिकीट दर कपातीमागोमाग बेस्टने सुरू केलेल्या विनावाहक ‘पॉइंट टू पॉइंट’सारख्या सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बेस्टची प्रवासी संख्या थेट ३४ लाखांपर्यंत पोहोचली. परंतु ती ५० लाखांवर नेण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी गाडय़ांची संख्याही सहा हजारांवर नेली जाणार आहे. रात्रजीवनामुळे हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे महिलांना यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल. सध्या मुंबईत १२.३० वाजेपर्यंत बस सुविधा आहे. मात्र २४ तास सेवा देण्यासाठी बेस्टला मनुष्यबळ वाढवावे लागेल.

बेस्टसोबतच काळ्या-पिवळ्या, अ‍ॅपआधारित खासगी टॅक्सी यांचीही मागणी वाढणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सी आताही रात्री-अपरात्री मिळतात, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. रात्रजीवनामुळे व्यवसाय मिळणार असेल तर टॅक्सीचालकही रात्रीची सेवा देतील, असे ‘मुंबई टॅक्सीमेन्स युनियन’चे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

अ‍ॅप आधारित टॅक्सी नेहमीच उपलब्ध होतात. मात्र २४ तास मुंबई सुरू राहिल्यास त्यांना आणखी सुरक्षित व स्वस्त सेवा देण्यासाठी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. यामध्ये प्रवाशांना आणखी काही प्रवास सवलत देता येऊ शकते का ते पाहावे लागेल, असे खासगी अ‍ॅप आधरित टॅक्सी सेवेच्या प्रतिनिधीने सांगितले.

रेल्वेला शक्य नाही

सीएसएमटीतून शेवटची लोकल मध्यरात्री १२.३१ला सुटते, तर हार्बरवर मध्यरात्री १२.४० आणि चर्चगेट स्थानकातून शेवटची लोकल मध्यरात्री एक वाजता सुटते. या लोकल शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होतो. त्यानंतर पहाटे कर्जत स्थानकातून मध्यरात्री २.३५ वाजता सीएसएमटीसाठी लोकल सुटते. ती पहाटे पाचच्या सुमारास पोहोचते. त्यामुळे रेल्वेला देखभाल-दुरुस्तीसाठी फारसा वेळ मिळत नाही. परिणामी मध्यरात्रीच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करता येणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी संगितले.