04 August 2020

News Flash

‘नीट’ अभ्यास करणार कसा?

अचानक आलेल्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांनाही ती प्रचंड मानसिक त्रास देणारी ठरली आहे.

पुस्तकेही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर यक्षप्रश्न; ग्रामीण विद्यार्थ्यांचे अधिकच हाल

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांची अकरावी-बारावी अशी दोन वर्षांची मिळून निव्वळ पाठय़पुस्तकेच मोजायची तर ती दहा भरतात. याशिवाय प्रत्येकाचे ‘एमसीक्यू’ अर्थात बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न अभ्यासायचे तर आणखी दहा पुस्तके. फक्त पाठय़पुस्तके वाचूनच अभ्यास करायचा तरी दहा आठवडे मुलांना पुरणार नाहीत; पण आपल्याकडून काही कमी पडायला नको म्हणून आम्ही सध्या बाजारात ‘एनसीईआरटीई’ची पाठय़पुस्तके शोधत फिरतो आहोत, तर तीही उपलब्ध नाहीत.. पाल्र्यातील विजय जोशी या पालकाची ही हतबल प्रतिक्रिया. वैद्यकीय प्रवेशांकरिता ‘नीट’ सक्तीची झाल्यानंतर सध्या अनेक कुटुंबांमध्ये हीच हतबलता साचून राहिली आहे.

ही झाली मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांत चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक शिक्षक, क्लासेस, दर्जेदार शैक्षणिक सोयीसुविधा लाभलेल्या मध्यमवर्गीय घरांमधली परिस्थिती. ग्रामीण भागांत तर सर्वच प्रकारच्या अभावग्रस्ततेमुळे विद्यार्थी तयारीत आधीच मागे असतात. त्यात नीटसाठी ‘एनसीईआरटीई’ची पाठय़पुस्तके शोधतानाच मारामार असल्याने दहा आठवडय़ांत दोन वर्षांचा अभ्यास भरून काढताना येथील विद्यार्थ्यांची अवस्था फारच दयनीय होणार आहे.

‘‘नीटबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रात्री उशिरा आल्यानंतर मी मुलीशी बोललो तेव्हा तिचा पहिला प्रश्न होता आणखी दोन महिने अभ्यास? गेली दोन वर्षे एमएचटी-सीईटीचा अभ्यास करण्यात मुलीने रात्रीचा दिवस केला होता; परंतु आता दहा आठवडय़ांत संपूर्णपणे नव्या अभ्यासक्रमावर आणि तीही अकरावी-बारावी वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा द्यावी लागणार असल्याने ती गोंधळून गेली आहे. धीर एकवटून अभ्यासाचे नियोजन करावे लागेल, असे माझ्या मुलीला सांगू लागलो तेव्हा तर तिची पहिली प्रतिक्रिया होती, बाबा, माझा मेंदूच चालत नाहीए.’’ अशा शब्दांत जोशी यांनी आपल्या १६ वर्षांच्या मुलीची, मीराची मानसिक अवस्था कथन केली.

अचानक आलेल्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांनाही ती प्रचंड मानसिक त्रास देणारी ठरली आहे. ‘एनसीईआरटीई’ची पाठय़पुस्तकेच बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. सतत हेलपाटा घालूनही पुस्तके उपलब्ध झालेली नाही, असे आणखी एका पालकाने सांगितले.

‘‘नीटला आमचा विरोध नाही. दोन वर्षांपूर्वी माझ्या मोठय़ा मुलीने ही परीक्षा दिली होती. सध्या ती केईएममध्ये शिकत आहे; परंतु अवघ्या दहा आठवडय़ांत पूर्णपणे नव्या परीक्षेला सामोरे जाण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करणे हा त्यांच्यावर मोठा मानसिक आघात आहे,’’ अशी प्रतिक्रिया व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या अनिष सबनीस यांनी व्यक्त केली.

दहा आठवडय़ांत दोन इयत्तांची मिळून असलेली दहा पाठय़पुस्तकेही संपूर्णपणे वाचणे शक्य नाही. अभ्यासक्रमावर आधारित कूटप्रश्न सोडविण्याची तयारी तर फारच पुढे राहिली. त्यातून जीवशास्त्रासारख्या विषयामध्ये तर ‘एनसीईआरटीई’ आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये तफावतच नव्हे, तर काही मुद्दय़ांवर परस्परविरोधी उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे, काही विषय जरी राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असले तरी विद्यार्थ्यांना एनसीईआरटीईची पाठय़पुस्तके नव्यानेच वाचून समजून घ्यावी लागणार आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:18 am

Web Title: niit exam issue
Next Stories
1 डान्सबारचा तिढा कायम..
2 विकास नियंत्रण नियमावलीत गच्चीवरील हॉटेलला परवानगी
3 पोलिसांकडे परवान्यासाठी फक्त ११ डान्स बारमालक!
Just Now!
X