निखिलने कधी चुकूनही कुणावर हात उगारला नव्हता. शाळेत कुणी टपली मारली तरी तो आपल्या आईकडे जाऊन तक्रार करायचा. त्यामुळे तो एका तरुणीवर चाकूहल्ला करून स्वत:ला संपवू शकतो, यावर विश्वास बसत नाही, असे निखिल बनकरच्या मित्रांनी सांगितले. निखिलच्या मृत्यूचा त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
निखिल बनकर हा शालेय जीवनापासूनच अत्यंत घाबरट होता आणि त्याने कधी कुणावरही हात उगारलेला नव्हता, अशी माहिती वांद्रे सरकारी वसाहतीमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राने दिली. आम्ही दहावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो. शाळेत त्याला कुणी टपली जरी मारली तरी तो, आईकडे तक्रार करायचा असे त्याच्या मित्राने सांगितले. पायल प्रकरणामुळे तो अस्वस्थ होता. पण तो असे काही करेल यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही, असे त्याच्या मित्राने सांगितले.
मनमिळावू असलेल्या निखिलचे वडील विक्रीकर खात्यात लिपिक म्हणून कामाला आहेत. पायलने संबंध तोडले तरी तो तिच्या मागे होता. निखिलच्या विरोधात दोनवेळा तक्रारी आल्या होत्या. पण त्याला समज देऊन सोडले तरी तो तिला त्रास देत होता. निखिलवर त्यावेळी योग्य कारवाई केली असती तर आजचा अनर्थ टळला असता असे चेतना महाविद्यालयातील पायलच्या मैत्रिणीने सांगितले. निखिलच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास असून आजीही गंभीर आजारी आहे. निखिलला एक लहान बहीण आहे.      

मृत्यूंजय फेल.. तरुणाई ओसरली
महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करुन त्यांच्यात सामाजिक भान निर्माण व्हावे या  उद्देशाने ‘मिशन मृत्यूंजय’ हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी राबवत आहे. असाच एक कार्यक्रम चेतना महाविद्यालयातही झाला होता. पण त्याचा दुर्देवाने निखिलवर काहीच परिणाम झाला नाही. चेतना महाविद्यालयात ‘तरुणाई’ हा महोत्सव सुरू होता. शनिवारी त्याचा चौथा दिवस होता. या घटनेचे वृत्त कळताच महाविद्यालय सुन्न झाले आणि ‘तरुणाई’ महोत्सव रद्द करण्यात आला.