काँग्रेसचे कायकर्ते संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने १७ मे रोजी ठेवली आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे तोंडी आश्वासन पोलिसांकडून या वेळी न्यायालयाला देण्यात आले असले तरी न्यायालयाने मात्र त्यांना तोपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अटकेची टांगती तलवार नीलेश यांच्या डोक्यावर कायम राहणार आहे.
चिपळूण न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने नीलेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्यासमोर त्यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाली असून त्यात तपास पूर्ण झाल्याचे आणि कोठडीची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब नीलेश यांच्या बाजूने जाणारी असल्यामुळे अटकपूर्व जामिनात त्यानुसार दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे त्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी नीलेश यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्यायालयाला केली. न्यायालयान सुनावणी १७ मे रोजी ठेवली आहे. परंतु पोलीस नीलेश यांच्या घरापर्यंत पोहोचले असल्याने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती शिरोडकर यांनी केली.