नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. संदीप सावंत सध्या ठाण्यामध्ये रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यावर या सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावर काहीच कारवाई न केल्यामुळे नीलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधिमंडळावर मराठा समाजाचा भव्य मोर्चा राणेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला न गेल्यामुळे नीलेश राणे यांनी संदीप सावंत यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. संदीप सावंत यांना चिपळूणपासून मुंबईपर्यंत मारत नेऊन तिथे त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्याचाही आरोप करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी मुंबईसह महाराष्ट्र बंद करू, असा इशारा नीलेश राणे यांनी रत्नागिरीत दिला. या मागणीसाठी ते राज्यव्यापी दौरा करणार आहेत.