मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एका ३६ वर्षीय महिलेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आता हळूहळू या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. याच प्रकरणाचा आधार घेत भाजपा खासदार नारायण राणे यांचे पुत्र भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “पुरावे असूनही मुंबई पोलिसांनी एक साधी तक्रार देखील घेतलेली नाही. शेवटी कोर्टालाच त्यावर अहवाल देण्यास सांगावं लागलं. करोना काळात कोर्ट वगैरे बंद होतं, म्हणून त्याला वेळ लागला. पण संजय राऊत किती भयानक माणूस आहे हे समोर आलं”, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर यासंदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात आदेश दिले असून २४ जून रोजी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या या महिलेने काही व्यक्ती संजय राऊत आणि तिच्या पतीच्या सांगण्यावरून आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. आभा सिंग यांनी या महिलेचं वकीलपत्र घेतलं असून उच्च न्यायालयात या महिलेची बाजू मांडत आहेत. दरम्यान, या महिलेला याचिका दाखल केल्यानंतर बनावट पीएचडी डिग्री असल्याच्या कारणाखाली अटक करण्यात आली असून गेल्या १० दिवसांपासून ही महिला अटकेत असल्याची माहिती आभा सिंग यांनी कोर्टाला दिली.

काय म्हणाले निलेश राणे?

भाजपा नेते निलेश राणे यांनी सदर प्रकरणावरून संजय राऊतांवर एका व्हिडीओच्या माध्यमातून टीका केली आहे. “संजय राऊतांच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ती महिला मुंबई पोलिसांकडे जाऊन सांगतेय की मला संरक्षण द्या, मला हा माणूस छळतोय, माझ्यामागे हेर लावले आहेत. त्याच्याविरोधात माझ्याकडे ऑडिओ क्लिप, व्हिडीओ क्लिप आहेत. एका व्हिडीओमध्ये तर चक्क संजय राऊतांनी या महिलेला आई-बहिणीवरून शिव्या घालून त्यांना धमकी दिली आहे. पण एवढे पुरावे असूनही एक साधी तक्रार त्या महिलेची मुंबई पोलिसांनी घेतलेली नाही. शेवटी कोर्टाला त्यावर अहवाल देण्यास सांगावं लागलं. करोना काळात कोर्ट वगैरे बंद होतं म्हणून त्याला वेळ लागला. पण संजय राऊत किती भयानक माणूस आहे हे समोर आलं आहे”, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

“शिवसेनेची हालत वर्धापन दिनाच्या ‘या’ बॅनरसारखीच”, निलेश राणेंचा टोला!

“नाहीतर संजय राऊतांना वाटेल मी काहीही करू शकतो!”

दरम्यान, या व्हिडीओमध्ये निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय राऊतांवर वेळीच कारवाई केली नाही, तर त्यांना वाटेल की मुंबईत, महाराष्ट्रात मी काहीही केलं तरी कुणाचा बाप मला काही करू शकणार नाही. ही त्यांची समज ठेचून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या महिलेच्या पाठिशी उभं राहायला हवं, असं निलेश राणे या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना येत्या २४ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून संजय राऊतांच्या वकिलांनी हे आरोप याआधीच फेटाळले आहेत.