आठवडय़ाची मुलाखत : नीना वर्मा   (सदस्य, कफ परेड आणि चर्चगेट-नरिमन पॉइंट रहिवासी संघ )

कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो-३ प्रकल्प अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरतो आहे. आता या प्रकल्पाकरिता शहरातील तब्बल पाच हजार झाडांचा बळी जाणार असल्याने तो वादात अडकला आहे. मुंबई महापालिकेने ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने काही ठिकाणी वृक्षतोड सुरूही झाली होती. मात्र कफ परेड आणि चर्चगेट-नरिमन पॉइंट रहिवासी संघांनी याला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या भागातील अनेक जुने वृक्ष यात बळी पडणार आहेत. या पाश्र्वभूमीवर येथील रहिवाशी संघाच्या नीना वर्मा यांची जाणून घेतलेली ही भूमिका.

* चर्चगेट परिसरातील झाडे वाचविण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे?

चर्चगेट-नरिमन पॉइंट भागाला सागरी किनारा लाभला आहे. येथे १९ व २०व्या शतकातील अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच, येथील जुनी वृक्षसंपदा हे या भागाचे वैशिष्टय़ आहे. हा परिसर मुंबईचे ऐतिहासिक वैभव आहे. एखाद्याला आयुष्यात खचितच कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी अशी जागा लाभते. या भागात नोकरीधंद्यानिमित्त अनेक लोक येतात. पण आम्ही तर चर्चगेट परिसरातच लहानाचे मोठे झाले आहोत. त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीशी आमचे नाते जोडले गेले आहे. या भागात अनेक वड आणि पिंपळाचे जुने वृक्ष आहेत. काही तर ७० ते १०० वर्षे जुनी आहेत. वातावरणातील बदल आणि प्रदूषण या मोठय़ा समस्या मुंबईलाही भेडसावत आहेत. ज्या जे. टार्टर रस्त्यावर आमचे वास्तव्य आहे तेथे रोज हजारोंच्या संख्येने वाहने ये-जा करतात. त्यामुळे या परिसरात प्रदूषणही जास्त होते. मेट्रो रेल्वे महामंडळाला येथे मेट्रोसाठी स्थानक बनवायचे आहे. त्यासाठी त्यांना येथील १०० झाडे तोडायची आहेत. या स्थानकाला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र त्यामुळे या भागातील ही झाडे गेली तर ते आमचे मोठे नुकसान ठरेल. कोणत्याही शहरात वड आणि पिंपळ यांसारखे वृक्ष नव्याने लावले जात नाहीत, कारण त्यांचा आकार खूप मोठा असतो. अशा काळात ही वड-पिंपळाची सारीच झाडे येथून हटवणे चुकीचे आहे. वैज्ञानिकदृष्टय़ा आणि वनस्पतिशास्त्रानुसार या झाडांचे कधीच पुनरेपण करणे शक्य होणार नाही. अशा झाडांना वाचविण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे.

* तुम्ही याचिका करण्याआधी मेट्रो प्राधिकरणाशी संपर्क साधला होतात का?

आम्ही गेल्या २ वर्षांपासून ही झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यापूर्वी आम्ही मेट्रो प्राधिकरणाला अर्ज केले होते, परंतु त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरही झालेल्या बैठकांमध्ये त्यांना आम्ही वारंवार एकच प्रश्न विचारत होतो की, या झाडांचे काय करणार आहात? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्हाला शक्य होईल त्या सगळ्या गोष्टी करू. एक वर्षांपूर्वी आम्ही सगळ्याच रहिवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, एमएमआरडीए आयुक्त, एमएमआरसीएल संचालक आदींशी पत्रव्यवहार केला होता. मुख्य सचिवांनी आम्हाला प्रतिसाद देत सांगितले की, आम्हाला प्रकल्पासाठी काही गोष्टी या कराव्याच लागतील. या झाडांना वाचविण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यानेच आम्ही याचिका करण्याचा निर्णय घेतला.

*  मेट्रो-३ ही शहराची गरज आहे. तसेच पर्यावरण संतुलनाकरिता वृक्षसंपदा जपणेही आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही यावर काय तोडगा सुचवाल?

मुंबईची गरज म्हणून मेट्रो बनवावी लागेल याबाबत आमचेही दुमत नाही. त्यासाठी काही झाडांचा बळी जाईल, ही बाबदेखील मान्य आहे. परंतु सध्या एका नवीन तंत्रज्ञानानुसार यातील ७० टक्के झाडे वाचवता येतील. त्यासाठी कदाचित मेट्रोच्या खर्चात २० टक्के वाढ होईल. पण ही झाडे वाचविण्यासाठी हा खर्च शासनाने करावा, असे आमचे मत आहे. ‘टनलिंग मेथड’ पद्धतीने अशी झाडे वाचवता येतात हे जगात सिद्ध झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतातही काही ठिकाणी वापरण्यात आले आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास ही झाडे नक्कीच वाचतील. शासनाने थोडे संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान आदींचा वापर करायचे ठरविल्यास ही झाडे निश्चित वाचतील.

* वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची कितपत हानी होईल असे वाटते?

या भागात झाडांशी आमचे भावनिक नाते आहे. ती आहेत म्हणूनच कदाचित आम्ही जगतो आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच हा केवळ रहिवाशांचाच प्रश्न नसून तो येथे येणाऱ्या ५० लाखांहून अधिक नोकरदार, पर्यटकांचाही आहे. या परिसरातील वृक्षसंपदेमुळे येथील हिरवाई टिकून आहे. मात्र या भागातले ५० मोठे वृक्ष जर कापून टाकले तर हा परिसर उजाड होईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे येथे दररोज हजारच नव्हे तर लाखांत वाहने ये-जा करतात. त्यातून होणारे कार्बन उत्सर्जन आणि लोकांकडूनही उच्छ्वासामार्गे सोडला जाणारा कार्बन याचे एकूण गणित मांडले तर मानवी आरोग्यासाठी ते हानिकारक ठरेल. कार्बन उत्सर्जन शोषून घेणारी आणि ऑक्सिजन देणारी झाडे नाहीशी झाल्यास कार्बनचे प्रमाण वाढेल आणि परिस्थिती भीषण होईल. मेट्रो प्राधिकरण कदाचित येथे झाडे लावेल. पण त्याला ७-८ वर्षे लागतील. तोपर्यंत येथील पर्यावरणाचे चित्र विदारक झाले असले.

*  स्थानिक नागरिकांच्या काय भावना आहेत?

मी चर्चगेटमध्ये १९७० पासून राहते आहे. ठाकूर निवास, रवींद्र मेन्शन, लोटस कोर्ट आदी भागांतील रहिवासी आमच्यासोबत आहेत. हा लढा माझ्या एकटीचा नाही. सगळ्याच स्थानिकांना ही झाडे हवी आहेत. त्यांच्या भावना झाडे वाचविण्याबाबत तीव्र आहेत. लहानपणापासून दारात पाहिलेले वृक्ष तुटतील ही भावना माझ्यापासून सगळ्यांसाठी क्लेशकारक आहे. मी अतिशयोक्ती करत नाही. मात्र येथीलच रहिवासी महिला म्हणाली होती की, येथील झाडे आहेत म्हणून मी जगते आहे. पण ही झाडेच गेली तर मलाही जावे लागेल.

मुलाखत – संकेत सबनीस