‘ट्राय’चे अध्यक्ष आर.एस.शर्मा यांचा दावा

मुंबई : भारतीय दूरसंचार नियमाक प्राधिकरणाने (ट्राय) १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहिन्या निवडण्याचा हक्क देणारा नवा नियम लागू केला असून या नव्या नियमानुसार देशभरात वाहिनीचे एक समान शुल्क निश्चित करण्यात आले. हा नियम लागू होऊन एक आठवडा झाल्यानंतर आतापर्यंत देशभरातील ९ कोटी घरांमध्ये नव्या नियमानुसार अंमलबजावणी झाली असून त्याप्रमाणे ग्राहक सेवा दिली जात असल्याची माहिती ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली. हा आकडा या महिन्याभरात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील नऊ कोटी घरांतील ग्राहकांनी त्यांच्या आवडीच्या वाहिन्या निवडल्या असून यामध्ये ६.५ कोटी स्थानिक केबल चालकांकडून आणि २.५ कोटी ग्राहक डीटीएच सेवा घेणारे आहेत, असे शर्मा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारतात दूरचित्रवाणी संच असणारी घरे १७ कोटी आहेत. त्यामध्ये सात कोटी ग्राहक डीटीएच सेवा घेणारे असून उर्वरीत १० कोटी ग्राहक स्थानिक केबल चालकाकडून सेवा घेत आहेत. त्यामुळे १७ कोटीपैकी कोटी कोटी घरात नव्या नियमांची अंमलबजावणी झाली आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

गोंधळलेल्या ग्राहकांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. समाजमाध्यमे, मुद्रीत माध्यमे, जाहिराती आणि देशाच्या विविध भागात विशेष कार्यक्रम आयोजित करुन नव्या नियमांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचबरोबर प्रक्षेपण कंपन्या, एमएसओ, डीटीएच चालक, स्थानिक केबल चालक यांच्यासोबत सतत संवाद साधण्यात येत आहे.  असेही शर्मा यांनी सांगितले.