ठाकुर्ली पूर्वेतील मीरानगर परिसरातील तीन मजली मातृकृपा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जण मृत्युमुखी पडले असून ११ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही इमारत कोसळली होती. त्यानंतर सुरू झालेले बचाव कार्य १२ तासांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी पूर्ण झाले. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवनियुक्त आयुक्त ई. रवींद्रन यांनी यासंबंधी पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
ठाकुर्लीतील मीरानगर परिसरात मंगळवारी रात्री मातृकृपा ही धोकादायक इमारत अचानक कोसळली. या इमारतीतील २० जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. दुर्घटनेच्या वृत्तानंतर अग्निशमन दल व कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यंत्रणा तोकडी पडल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. अखेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व बृहन्मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांतर जोमाने बचावकार्य सुरू झाले. या दुर्घटनेत नऊ जण मृत्युमुखी पडले तर ११ जण जखमी झाले. मृतांमध्ये टी.व्ही. ईश्वरन (६७), उषा कुशन (४९), पार्थिक झांझारिया (१०), उषा सुंदरम (४८) विनू फ्रान्सिस नादार (११), फ्रान्सिस नादार (४४), जमनाप्रसाद शर्मा (७०), रोहित गिरी (१८) सुलोचना रेड्डीज (७५) यांचा समावेश आहे; तर जखमींमध्ये असारी सुकुमारण (५०), महेंद्र शर्मा (२८), पेनायल ईश्वरण (६३), हेतल झंझारकिया (१९), सुशीला झंझारकिया (५०), दीपक रेड्डीज (५२), ईश्वर झांझारिया (४५) यांचा समावेश असून त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रदीप शर्मा या १९ वर्षीय मुलाच्या हातास गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला शास्त्रीनगर येथून शीव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच भाग्यलक्ष्मी अय्यर (२२), रेखा मालतकर (१५) व सौकीया मालन (९) यांना येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर कल्याणी पाटील, आयुक्त ई. रवींद्रन, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी भेट दिली.