दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱया बळीराजाला सर्व स्तरांतून मदतीचा हात पुढे येत आहे. सेलिब्रिटींपासून अगदी सामान्य नागरिकही पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी निधी देत आहेत. पण, या यादीत आता वेगळ्याचं सेलिब्रिटीचं नाव सामील झालं आहे. खरं तर ही कोणी सेलिब्रिटी नाही पण तिने केलेल्या कार्याने ती सर्वांसाठी नक्कीचं एक सेलिब्रिटी होईल. राशिका मनोज जोशी (वय ९) या चिमुरडीने तिची पिगीबँक दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. यासंबंधीचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेयं.


रसिकाच्या घरच्यांशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी कळले की, नागपूरस्थित जोशी हे मुख्यमंत्र्यांच्या परिचीतांपैकी आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आमीर खानने जलयुक्त शिवारसाठी ११ लाखांचा धनादेश दिला होता. त्याचा फोटो रसिकाने पेपरमध्ये पाहिला. रसिका आमीरची चाहती आहे. तिला आमीरचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. त्यामुळे पेपरमध्ये फोटो पाहताचं तिने घरच्यांना विचारले आमीरचा फोटो या काकांसोबत कसा?  हे काका तर आपल्या घरी येतात. त्यावेळी तिच्या घरच्यांनी तिला दुष्काळग्रस्तांबद्दल सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून पोळा सणासाठी पैसे साठवत असलेल्या रशिकाने  जराही विचार न करता त्याचवेळी दुष्काळग्रस्तांना मदत करायचे ठरवले. आई-बाबांकडून पॉकेटमनीमध्ये मिळणारे पैसे ती पिगीबँकमध्ये टाकते. तिने स्वतः तर मदत केलीचं त्याचसोबत आपल्या शाळेतील मित्रमैत्रीनींनासुद्धा दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
रशिका ही नागपूरमधील भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदीर या शाळेत चौथी इयत्तेत शिकतेयं. शेतकरी खूप कष्ट करतात, आपण त्यांना मदत करायला हवी असे म्हणत यापुढेही आपण त्यांना मदत करू असे रशिकाने म्हटले. आपल्या आवडता अभिनेता आमीरप्रमाणे अभिनय क्षेत्रात आपले करियर करण्याची तिला इच्छा आहे. तिने यावेळी आपल्या आमीरला भेटण्याची इच्छादेखील व्यक्त केली. दरम्यान, रशिकाच्या मदतीचे स्वरूप जरी लहान असले तरी सामाजिक भान दाखवून या चिमुकलीने घेतलेला पुढाकार बळीराजाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सहाय्यक नक्कीच ठरेल.