जगातील सर्वाधिक उंचीची शिडी ताफ्यात ठेवण्याचा मान मुंबई अग्निशमन दलाला मिळणार असला तरी या शिडीचा नेमका किती उपयोग होईल, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. तब्बल १६ मीटरहून लांब व ५० टनांहून अधिक वजन असलेल्या या वाहनाला शहराच्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार असून अरुंद गल्ल्या व वळणांवरून माग काढत इमारतीपर्यंत पोहोचणेच कठीण होणार आहे.
शहरात गेल्या दहा वर्षांत उंच इमारतींची संख्या वाढली आहे. ७० मीटरहून अधिक उंचीच्या सुमारे साडेसहा हजार इमारती शहरात आहेत. या इमारतींमधील आगीच्या घटनांसाठी अग्निशमन दलाकडे भायखळा केंद्रात असलेली ६८ मीटरची २२ व्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडीही अपुरी ठरू लागली. त्यामुळे फिनलंडहून ९० मीटर उंचीची शिडी आयात करण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी पालिकेत मंजूर करण्यात आला.
यापेक्षा अधिक उंचीची शिडी जगात कुठेही बनवली गेलेली नाही. तिसाव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी, १५ कोटी रुपयांची ही शिडी फिनलंडवरून आता मुंबईत आली आहे. सध्या भायखळा येथील केंद्रात असलेली ही शिडी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर दलात समाविष्ट केली जाणार आहे.
अग्निशमन दलाच्या भायखळा केंद्रात उभ्या असलेल्या ६८ मीटर उंचीपर्यंत जाणाऱ्या शिडीच्या वाहनाची लांबी १२ मीटर आहे. त्यापेक्षा कमी लांबीच्याही शिडय़ा अग्निशमन दलाकडे आहेत. मात्र ही वाहनेही अरुंद रस्त्यांवर नेण्यात तसेच शिडी लावण्यासाठी योग्य जागा शोधताना जवानांना कसरत करावी लागते. अनेकदा शिडी लावण्यासाठी जागा मोकळी करण्यातही मोलाचा वेळ खर्च होता.
या पाश्र्वभूमीवर ९० मीटर उंचीच्या या नव्या शिडीच्या वाहनांची १५ मीटरपेक्षा अधिक लांबी अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामात अधिक भर टाकणारी आहे. या वाहनाचे वजनही पन्नास टनांहून अधिक असून त्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष परवानगी घेण्यात येत आहे.
या वाहनाला मुंबईच्या रस्त्यावर फिरण्याची परवानगी मिळाली तरी हे वाहन वळण्यासाठी आवश्यक असणारी जागा शहरातील रस्त्यांवर मिळणे कठीण आहे. वाहतूककोंडी व अरुंद रस्त्यांमुळे याआधीच्या शिडय़ांचा वापरही मर्यादित प्रमाणात होत असताना १५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झालेल्या या शिडीचा नेमका किती उपयोग होईल, याबाबत अग्निशमन दलातील जवानही साशंक आहेत.
वाहनाची लांबी, रुंदीसोबतच उंची हासुद्धा वेगळ्या पद्धतीने अडथळा आहे. एवढय़ा उंचावर जाताना वाऱ्याचा सामना करावा लागतो.
त्यातही ही शिडी केवळ तिसाव्या मजल्यापर्यंतच पोहोचणार असून त्यावरच्या मजल्यांसाठी उपयोगाची नाही. त्यामुळे उंच इमारतींमधील अग्निशमन यंत्रणाच बळकट करणे गरजेचे आहे, असे मत अग्निशमन कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शहरातील वाहतूककोंडी व अरूंद रस्ते हे वास्तव आहे व त्याचा सामना आम्हाला करावाच लागणार आहे. अग्निशमन सुरक्षेसाठी लघु, मध्यम व मोठय़ा अशा तीनही स्तरावर उपाय आवश्यक आहेत.
अरुंद रस्त्यांवर ही शिडी नेण्यात अडचणी आहेत. मात्र तेथे लघु अग्निशमन केंद्राचा पर्याय लागू पडेल, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

उपलब्ध शिडय़ा
भायखळा – ४२ मीटर – १२ मजले, ६८ मीटर – २२ मजले, ५५ मीटर – १८ मजले.
नरिमन पॉइंट – ४२ मीटर – १४ मजले
मुलुंड – ४२ मीटर – १४ मजले
चेंबूर – ४२ मीटर – १४ मजले
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स – ३७ मीटर- १२ मजले
विक्रोळी- ३७ मीटर – १२ मजले
अंधेरी – ३७ मीटर – १२ मजले