पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी असलेला हा बंगला पाडण्यात यावा असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

एवढेच नाही अलिबागमधील एकूण १२१ अनधिकृत बंगले आणि मुरुडमध्ये १५१ अनधिकृत बंगले आहेत,  असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागांमध्ये आहेत. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

अलिबागमधील किहीम या गावात नीरव मोदीचा बंगला आहे. तर मेहुल चोक्सीचा बंगला आवास या गावात आहे. सीआरझेडच्या तरतुदींनुसार नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. इतर बंगल्यांचे काय होणार असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा यातल्या काही बंगल्यांची प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत असे उत्तर रामदास कदम यांनी दिले.

अलिबागमधील एकूण २०२ अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. लवकरात लवकर ही कारवाई केली जाणार आहे असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या सर्व प्रकरणात अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामद्ये १ लाख रूपये दंडापासून ५ वर्षे कैद इथपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.