15 July 2020

News Flash

‘निसर्ग’ वादळ: कारने प्रवास करत असाल तर हातोडा जवळ ठेवा; बीएमसीची सूचना

'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून कार-जीप इत्यादी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार-जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. पाण्यात गाडी अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन ठेवावे असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावयाचे झाल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज (दि.३) ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 8:32 am

Web Title: nisarga cyclone bmc has appealed to people to carry tools such as hammers in their cars sas 89
Next Stories
1 केईएमध्ये ३५ रुग्णांमागे केवळ ३ निवासी डॉक्टर
2 Cyclone Nisarga : आता झुंज वादळाशी..
3 ४८.५४ लाख मुंबईकरांवरील निर्बंध कायम
Just Now!
X