अरबी समुद्रातील चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा

मुंबई-कोकण पट्टय़ात जोरदार पावसाचा अंदाज

घरीच राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती  आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळ-पासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसात पूर्वमध्य व लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून मंगळवारी सायंकाळी ते मुंबईपासून ३५० किमी तर अलिबागपासून ३०० किमी आणि गोव्यापासून २८० किमीवर होते.

कोल्हापूर, जालना, सातारा या जिल्ह्य़ांत बुधवारी मुसळधार पावसाची, तर सांगली सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडय़ात हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ यामुळे मंगळवारी सायंकाळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी पाऊस पडला. कुलाबा, दादर, पवई, कांदिवली, मीरा भाईंदर या ठिकाणी १० ते २० मिमी पाऊस झाला. ठाणे, नवी मुंबई, जुहू, वरळी, बोरीवली, मुलुंड भांडुप, चेंबुर या ठिकाणी ५ ते १० मिमि पावसाची नोंद झाली. नवी मुंबईत काही ठिकाणी १० ते २० मिमी पाऊस झाला.

अतिवृष्टीचा अंदाज..

बुधवारी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांना काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मच्छीमारांना धोक्याची सूचना देण्यासाठी अलिबाग किनाऱ्यावर मंगळवारी ‘३ नंबरचा बावटा’ फडकविण्यात आला. हा ३ नंबरचा बावटा धोकादायक स्थितीतच फडकावला जातो. गेल्या वर्षी राज्यात दोन वेळा वादळांपूर्वी तो फडकावण्यात आला होता. अशा प्रकारचे एकूण १२ बावटे असतात.

धोका काय?

आज, बुधवारी चक्रीवादळ अलिबागच्या जवळ येईल तेव्हा ताशी ११० ते ११० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.  या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या दरम्यान समुद्रात मोठय़ा लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राकाठच्या क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, विद्युत वाहिन्या, कच्ची घरे, झाडे यांना हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई-कोकण आज-उद्या बंद

मुंबई : वादळापासून रक्षणासाठी बुधवार, ३ जून व गुरुवार, ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये-उद्योग बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.