मुंबई : हिमांशू रॉय जेव्हा मुंबईत पहिल्यांदा नियुक्त झाले तेव्हा सडपातळ होते. सहा फूट उंचीचे रॉय यांची नाशिक येथे पोलीस आयुक्तपदी बढतीने नियुक्ती झाली आणि तेथे त्यांना व्यायामाचे वेड लागले. झपाटल्यासारखे ते व्यायाम करू लागले. चांगलीच शरीरयष्टी कमावलेले रॉय नाशिकहून मुंबईत सहआयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांना तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी ‘दबंग’ म्हणून संबोधले आणि आयपीएस लॉबीत ते रूढही झाले. रॉय यांनीही स्वभावाप्रमाणेच हसतमुखाने या नावाचाही स्वीकार केला. पोलीस दलातीलच नव्हे तर अभ्यागतांशीही सौजन्याने वागणारा हा ‘दबंग’ अधिकारी प्रचंड लोकप्रिय होता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची बातमी पोलीस दलातील प्रत्येकाला चटका लावून गेली.

गुन्हे अन्वेषण विभागाची कुठलीही पाश्र्वभूमी नसताना रॉय यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर त्या वेळी टीकाही झाली होती; परंतु आर. आर. आबांचा विश्वास सार्थ ठरवीत रॉय यांनी आपली नियुक्ती योग्य होती ते दाखवून दिले. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्तपद मिळविणे हे तेव्हा मानाचे समजले जात होते. त्यात रॉय यशस्वी झाले असले तरी ते चमक दाखवतील, असे कोणालाही त्या वेळी वाटले नव्हते; परंतु रॉय यांच्या काळात गुन्हे अन्वेषण विभागाचा आलेख सतत उंचावतच गेला. अनेक ‘हाय प्रोफाइल’ प्रकरणेही त्यांनी लीलया हाताळली. आपल्या कार्यपद्धतीने त्यांनी या विभागाची अशी काही बांधणी केली की, अनेक अधिकारी पुन्हा या विभागात नियुक्ती मागू लागले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक गुन्ह्य़ांची उकल केली. प्रामुख्याने गुन्ह्य़ाची उकल ही संबंधित युनिटकडून केली जात असते; परंतु या प्रत्येक गुन्ह्य़ाची उकल करताना रॉय यांनी खूप रस घेतला. पत्रकार जे. डे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. जेव्हा मारेकरी पकडले गेले तेव्हाच ते घरी गेले. सहकाऱ्यांवर कमालीचा विश्वास टाकत आपली आगळ्या पद्धतीने छाप पाडणारा अधिकारी, असे मत त्यांच्या हाताखाली काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. गुन्हे अन्वेषणाच्या बैठकीत एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याने काही मते मांडली तर त्यालाही किमत देणारा, वेळेला धावून जाणारा अधिकारी अशी त्यांची विविध रूपे त्यांचे सहकारी नोंदवतात. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागातून ते राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख झाले तेव्हाही अनेक अधिकाऱ्यांनी एटीएसमध्ये बदल्या करून घेतल्या होत्या. काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पत्रमोहिमा उघडल्या. त्यांना पोलीस गृहनिर्माण विभागात कमी महत्त्वाच्या पदावर जावे लागले. तेथेच कर्करोगाने त्यांना गाठले आणि मग ते पोलीस दलात परत आलेच नाहीच.. मूळचे मुंबईकर असलेल्या रॉय यांचे मुंबईचे पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न होते; परंतु त्याआधीच त्यांनी ‘एक्झिट’ घेतली.

हिमांशू रॉय यांना मूत्रपिंडाचा कर्करोग

* हिमांशू रॉय यांना हाडांचा कर्करोग नसून मूत्रपिंडाचा कर्करोग होता व तो हाडांमध्ये पसरला होता, अशी माहिती नाशिकच्या एचसीजी मानवता केअर सेंटरचे कार्यकारी संचालक डॉ. राज नगरकर यांनी दिली.

* या केअर सेंटरमधील सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर या केंद्रामध्ये हिमांशू रॉय यांच्या तपासण्या केल्या जात होत्या. या तपासण्यांच्या आधारे त्यांच्यावर मुंबई आणि पुण्यामध्ये उपचार सुरू होते.

* हिमांशू यांना २००० सालापासून मूत्रपिंडाचा कर्करोग होता. २०१६ पर्यंत त्यांची प्रकृती बरी होती. मात्र मागील दोन वर्षांपासून कर्करोग हाडापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, असे पुढे डॉ. नगरकर यांनी सांगितले.

आत्महत्येच्या घटनेनंतर रॉय यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये नेण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुपारी पावणेदोनच्या सुमारास डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिव जीटी रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. जे. जे. रुग्णालयाच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी ६ वाजता शवविच्छेदन करण्यात आले असून याचा अहवाल पुढील सहा आठवडय़ांमध्ये देण्यात येईल, असे जीटी रुग्णालयाचे उपधीक्षक डॉ. विकास मैदाड यांनी सांगितले.