आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर छत्र उभारण्याचं आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळलं नाही, ज्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारलं आहे. एवढंच नाही तर, ‘आम्ही दिलेले शब्द पाळतो, पहिले आमचे छत्रपती मग जाऊ करा अयोध्येत आरती’ असा ट्विट करत शिवसेनेला टोलाही लगावला आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारले. उद्धव ठाकरे हे नेहमी भगव्याचं राजकारण करत आले आहेत. आता अयोध्येला जाण्यामागेही राजकारणच आहे. मंदिर उभारण्याची उद्धव ठाकरेंची कुवत नाही अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करताना उद्धव ठाकरे म्हटले होते की, शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा शिवसेने इथे रायगड उभा करेल. चार मार्चला पुतळ्याचं पूजन करून शिवसेनेने शिवजयंतीही साजरी केली होती. मात्र छत्र उभारण्याचा बहुदा शिवसेनेला विसर पडला असावा. नेमकी हीच संधी साधत नितेश राणे यांनी छत्र उभारलं आणि शिवसेनेची राम मंदिर उभारण्याची कुवत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.