शिव वडा-पावच्या नावाखाली शिवसेना खंडणीचे रॅकेट चालवित असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमान संघटनेचे नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी मुंबईत केला. शिव वडा-पावची गाडी चालविणारे ९० टक्के लोक उत्तर भारतीय असल्याचाही आरोप त्यांनी केला.
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत नीतेश राणे म्हणाले, मुंबईतील एका शिव वडा-पाव स्टॉलचे आमच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये असे आढळले की हे स्टॉल्स महापालिकेचे नियम पायदळी तुडवून चालविले जातात. हा स्टॉल सुरू करण्यासाठी संबंधित व्यक्तीला दीड लाख रुपये गुंतवावे लागतात. त्याचबरोबर फुटपाथवर लावल्या जाणाऱया या स्टॉल्सवर कारवाई होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांना हजारो रुपये द्यावे लागतात, असे आम्हाला आढळले. किती मराठी लोक शिव वडा-पावचा व्यवसाय करतात, याची माहिती शिवसेना आणि महापालिकेने दिली पाहिजे. ९० टक्के उत्तर भारतीय लोकच हा व्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी माणसाला रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली शिव वडा-पावचा व्यवसाय सुरू करण्यात आला. मात्र, यामध्ये मराठी माणसाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही नीतेश राणे यांनी केला. या विषयावरून शिवसेनेने राजकारण करणे थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.