आज फक्त पत्रकार परिषद उधळली आहे, कोकणाकडे वाईट नजरेनं पाहिलं तर भविष्यात दोन पायावर चालून जाणार नाही अशी धमकी आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. नाणार प्रकल्प बचाव समितीने आज मुंबईत आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने उधळून लावली. तर हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवत आक्रमक भूमिका घेतली.

नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘हे खरं तर आमच्या कोकणाच्या उरावर बसणारे बदमाश आहेत. यांना आमच्या कोकणाबद्दल प्रेम नाही. आमच्या कोकणाला उद्ध्वस्त करायचं आहे त्यांच्यापैकी हे लोक आहेत. आज फक्त पत्रकार परिषद उधळली आहे, कोकणाकडे वाईट नजरेनं पाहिलं, तर भविष्यात दोन पायावर चालून जाणार नाही’.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कुणी विरोध करू नये कारण यामुळे कोकणातील एक लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे असा दावा प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष अजय सिंह सेनगर यांनी केला. कोकणातील बेरोजगारी दूर होईल आणि आर्थिक उत्पन्न या प्रकल्पामुळे वाढेल असा दावाही करण्यात येत आहे.

शिवसेना व मनसेसह काही राजकीय पक्ष नाणारला विरोध करत असून हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा कट व कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, ही बाजू मांडण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती, परंतु महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमचा काय कोकणाशी संबंध असं म्हणत पत्रकार परिषद उधळली.