भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आल्यापासून दोन्ही पक्षांची अवस्था तुझे माझे जमेना… अशीच काहिशी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंकडून सत्ता सोडण्याची भाषाही अनेकदा झाली आहे. मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास होत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला विरोधकांनीही अनेकदा देऊन झाला आहे.

आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव जात नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. अशात आता नितेश राणे यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे विरूद्ध शिवसेना असे ट्विटरवॉर किंवा पोस्टर वॉर बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी हेराफेरी या हिंदी सिनेमातील एक प्रसंग निवडला आहे. या प्रसंगातील परेश रावल यांच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा, अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चेहरा लावून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

परेश रावलला अक्षय कुमार इशारा देतो की मी आता घरातून निघून जाईन. अक्षय कुमार परेश रावलला सांगतो की तू जा. मग अक्षय कुमार गेल्यासारखे करतो आणि पुन्हा येऊन म्हणतो मी घरभाडे दिल्याशिवाय जाणार नाही. मग परेश रावल म्हणतो की याचा अर्थ तू घरातून कधीही जाणार नाही. अशा आशयाचा हा प्रसंग आहे जो राजकीय नेत्यांचे चेहेरे लावून नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. उद्धव ठाकरे जेव्हा सरकारला सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देतात तेव्हा काय होते तुम्हीच पाहा अशा ओळी लिहून हा व्हिडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. याआधीही असे ट्विट त्यांनी करून झाले आहेत. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला शिवसेनेकडूनही त्याच स्टाईलने उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत राणे विरूद्ध शिवसेना असा ‘सामना’ रंगला आणि सोशल मीडिया किंवा पोस्टरच्या माध्यमातून एकमेकांवर ‘प्रहार’ करण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको.

पाहा व्हिडिओ