भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्या फेरनिवडीबाबत दिवसभर पसरलेल्या अनिश्चिततेचे सावट अखेर रात्री गडकरी यांच्या राजीनाम्याने संपले. पक्षांतर्गत विरोध लक्षात घेता या पदावर राहणे उचित नाही, असे संघश्रेष्ठींना सांगत स्वत गडकरी यांनीच पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. गडकरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी आदी नेते मुंबईत असल्याने, मंगळवारी साऱ्या घडामोडींचे केंद्र मुंबईतच राहिले. रात्री भैयाजी जोशी यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर गडकरी यांनी आपला राजीनामा दिल्लीत पाठविल्याचे समजते.
 अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी मुंबईत गडकरी आणि संघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या चर्चेच्या फैरी झडल्या, तेव्हा दिल्लीतही अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांना वेग आला होता.
या पाश्र्वभूमीवर, गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या फेरनिवडीस पहिल्यापासूनच फारसे अनुकूल नसलेले लालकृष्ण अडवाणी यांनी दिवसभर या घडामोडींबाबत मौनच पाळून गडकरी यांची फेरनिवड पसंत नसल्याचे स्पष्ट संकेत अखेरच्या क्षणापर्यंत दिले होते.
मुंबईजवळील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्ती समारंभास उपस्थित असलेले अडवाणी, गडकरी आणि भैयाजी जोशी यांनी या कार्यक्रमानंतर अध्यक्षपद निवडीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर मात्र, म्हाळगी प्रबोधिनीतच अडवाणी, गडकरी आणि भैयाजी जोशी यांच्यात सुमारे पाऊण तास बैठक झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही या बैठकीबाबत कळविण्यात आले होते.
गडकरी यांच्या फेरनिवडीवर संघाचे नेते आग्रही असले तरी अलीकडे झालेले आरोप, दाऊद-विवेकानंदांच्या बुद्धय़ांकाच्या तुलनेनंतर उठलेले वादळ, आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध या बाबी लक्षात घेऊन अध्यक्षपदावर राहणे उचित नसून या कलाहाला आपण कंटाळलो आहोत, असे मत गडकरी यांनीच व्यक्त केल्याने, मोहन भागवत यांना गडकरी यांचे हे मत कळविण्यात आले आणि संघानेही संमती दिल्यानंतर गडकरी यांनी राजीनामा दिला, असे समजते. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी यशवंत सिन्हा यांचे नाव निश्चित करावे असा आग्रह याच बैठकीत अडवाणी यांनी धरला, परंतु गडकरी यांनी राजनाथ सिंह यांचे नाव सुचविले.
आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेबाहेर जात आहोत, पण राजनाथ सिंह यांनाच पक्षाध्यक्ष करावे अशी आग्रही भूमिका गडकरी यांनी घेतली. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या नावावरही मुंबईतच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या अध्यक्षपदी गडकरी यांची फेरनिवड होणार का, या विषयी गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा आणि पक्षांतर्गत मतभेदांचे वादळ सुरू होते. या पाश्र्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते मुंबईत असल्याने ते आपली भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती. पण त्यांनी याविषयी कोणतेही संकेत देण्याचेही टाळले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या पूर्वसंध्येसच, मंगळवारी गडकरी मुंबईत असतानाच प्राप्तीकर खात्याने पूर्ती समूहाशी संबंधित असलेल्या मुंबईतील नऊ कंपन्यांची चौकशी केल्याने पुन्हा या वादळाने उचल खाल्ली, आणि अखेर गडकरी पायउतार झाल्यानंतर ते शमले.