तरंगत्या हॉटेलमध्ये एवढा रस का, काँग्रेसचा सवाल

दक्षिण मुंबईत नौदलाला एक इंचही जमीन देणार नाही. त्यांनी सीमेवर जावे. नौदलाचे मुंबईत काम काय आहे, असे विधान केल्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आहे. गडकरी यांनी नौदलाचा अपमान केला असून त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंबईत नौदलाला एक इंचही जमीन देणार नाही ही भाषा सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबईच्या सुरक्षेसाठी अरबी समुद्रात नौदल डोळ्यात तेल घालून पहारा देत असताना गडकरी यांना तरंगत्या हॉटेलची जास्त काळजी का तसेच तरंगत्या हॉटेलसाठी त्यांना एवढा रस का, असा सवाल सावंत यांनी केला आहे. २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर नौदलाने मुंबईतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. सुरक्षेच्या मुद्दय़ावरच दक्षिण मुंबईत हेलिपॅड किंवा इमारतींच्या पुनर्बाधणीला नौदलाने यापूर्वी आक्षेप घेतला होता. तरंगत्या हॉटेलला त्यातूनच परवानगी नाकारली असेल. ही बाब गडकरी यांना एवढी का झोंबावी, असा मुद्दाही काँग्रेसने उपस्थित केला. देशाच्या सुरक्षेपेक्षा गडकरी यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्राची जास्त काळजी आहे, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हाणला आहे.

नौदलाला एक इंचही जमीन देणार नाही, असे वक्तव्य करून गडकरी यांनी नौदलाचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.