भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या इच्छा ‘पूर्ती’ साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसावले असून त्यांनी महाराष्ट्रात कोटीच्या कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उड्डाणे सुरू केली आहेत. शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केल्याने भाजपने आखलेली सत्ताप्राप्तीची रणनीती अमलात आणण्यासाठी गडकरी यांनी रस घेतल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.
देशातील महत्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता यावी, यासाठी कामाला लागण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तीच इच्छा आहे. तसे न झाल्यास मोदी प्रभाव संपल्याची हाकाटीही सुरू होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करायचेच, या जिद्दीने  भाजपकडून पावले टाकली जात आहेत. त्यादृष्टीने राज्यातील भाजपच्या नेतृत्वाचा प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला केंद्रीय राजकारणातच काम करण्यातच रस असून महाराष्ट्रात परत यायचे नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले असले, तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची एक संधी त्यांना खुणावत असल्याचे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. गडकरी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसला, तरी मुख्यमंत्रीपदात रस नसेलच असे नाही, असे हे नेते सांगतात. यावर अधिकृतपणे भाष्य करण्यास मात्र  कोणीच तयार नाही.
राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी मोदी व शहा हे लक्ष ठेवून असल्याने केंद्र सरकारकडूनही विशेष रसद पुरविली जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाची संधी खुणावत असल्यानेच गडकरी राज्यात सक्रिय झाले असल्याचा या नेत्यांचा दावा आहे.  
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपला जागा वाढवून देण्याची शिवसेनेची तयारी नसल्याने जागावाटपाचे घोडे अडलेले आहे. ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा आक्रमक प्रचार शिवसेनेने राज्यभर सुरू केला आहे. त्या तुलनेत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे नेते फारसे आक्रमक दिसत नाहीत. त्यामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये अजून निवडणुकीसाठी चैतन्याचे वातावरण नाही. राज्यात कार्यकर्ता मेळावे होत असले तरी जनतेमध्ये त्याची फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे, थेट जनतेला भिडतील असे मुद्दे घेऊन गडकरी यांनी महाराष्ट्रात वावरण्यास सुरुवात केल्याने या दाव्यात तथ्य असल्याचे मानले जात आहे.
राज्यात भाजपची सत्ता आणायची असेल, तर आक्रमकपणे प्रचाराच्या मैदानात उतरले पाहिजे, हे ओळखून केंद्रात पक्षाची प्रचारनीती ठरत असताना स्वत गडकरी यांनी मात्र, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवून त्यानुसार पावले टाकण्यासही सुरुवात केली आहे. राज्यातील खासदार व अन्य नेत्यांना मार्गदर्शन करण्यातही ते पुढाकार घेत आहेत. गेल्या काही दिवसांत गडकरी यांचा महाराष्ट्रातील वावरही वाढला असून संसदेच्या अधिवेशनकाळातही ते दर एक-दोन आठवडय़ांनी त्यांनी महाराष्ट्रात व विशेषत मुंबईत भेटी दिल्या. त्यांच्याकडे असलेल्या खात्यांमधीलच नव्हे, तर राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्याकरिता आणि राज्याच्या प्रश्नांबाबतचे महत्वाचे निर्णय घेण्याकरिता दिल्लीत ते सक्रिय झाले आहेत.