केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मंगळवारी सकाळी गडकरी आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची माहिती गडकरींनी मातोश्रीवरुन निघताना दिली. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर आल्याची माहिती गडकरींनी दिली.

‘उद्धव ठाकरेंसोबतची भेट कौटुंबिक स्वरुपाची होती. ४ डिसेंबरला माझ्या मुलीचा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना देण्यासाठी मातोश्रीवर आलो होतो,’ असे गडकरींनी म्हटले. उद्धव ठाकरेंसोबत काही राजकीय चर्चा झाली का, असा प्रश्न यावेळी गडकरींना विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘फक्त मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली,’ असे उत्तर देत गडकरींनी अधिक बोलणे टाळणे.

केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आणि या निर्णयावरुन शिवसेनेने घेतलेली भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर गडकरींनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. शिवसेनेचे खासदार नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जिल्हा बँकांना नोटा बदलायची परवानगी नाकारण्यात आल्याचा मुद्दा या बैठकीत महत्त्वाचा असेल. याशिवाय नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करण्यात आले होते. या मुद्यावरुन शिवसेनेने तृणमूल काँग्रेसची साथ देत राष्ट्रपतींना निवेदनही दिले होते. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने शिवसेनेचा विरोध मावळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नोटाबंदीवर संसदेत चर्चा व्हावी, ही विरोधकांची मागणी आहे. शिवसेनेनेदेखील ही मागणी केली आहे. ‘नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वपक्षीय नेते बोलत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचादेखील यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यावरुन सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात यावी,’ अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

[jwplayer gzWvwV1h-1o30kmL6]

नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला विरोध करताना शिवसेनेने तृणमूल काँग्रेसची साथ दिली होती. यानंतर विरोधकांना साथ दिल्यावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे केंद्रातीय मंत्री अनंत गीते यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. मात्र गीते यांनी या इशाऱ्याला फारसे महत्त्व न दिल्याने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंसोबत दूरध्वनीवरुन चर्चा केली होती.

[jwplayer KxtdOAno-1o30kmL6]