रस्ते आणि पूल उभारून मुंबईच्या सौंदर्याला सिमेंटची आणखी बाधा होऊ नये यासाठी मुंबईत भुयारी वर्तुळाकार रस्ता बांधण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. सुमारे ९० हजार कोटींचा हा प्रस्तावित भुयारी ‘रिंग रोड’ भविष्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडण्याचेही केंद्र सरकारने ठरविले आहे.
मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढताना यापुढे या महानगरीमध्ये सिमेंटचे जाळे फोफावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असून हॉलंडच्या दौऱ्यात आपण असे भुयारी मार्ग पाहिल्यानंतर मुंबईतही अशीच व्यवस्था उभारण्याची कल्पना आपल्या मनात आली, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
या मार्गाच्या उभारणीसाठी ९० हजार कोटींचा निधी लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात निधीची उपलब्धता हा मुद्दा महत्वाचा नाही, पण हा प्रकल्प आणखी कमी खर्चात कसा उभारता येईल, याचा विचार  सुरू असून त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पाचा खर्च ६० हजार कोटींपर्यंत कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

*या भुयारी मार्गाचा एक टप्पा माहीमच्या खाडीपासून सुरू होईल.
*वांद्रे-वरळी सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंटपर्यंतचा परिसर या भुयारी मार्गामुळे जोडला जाईल.
*भुयारी मार्गाचा दुसरा टप्पा शिवडीपासून न्हावा शेवापर्यंत जोडता येईल.
*भाईंदरजवळ हा मार्ग प्रस्तावित मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडला जाईल.