नवी मुंबईतील खारघर टोलनाक्यावरून नागरिकांचा वाढता उद्रेक पाहता गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. नागरिक आणि प्रसारमाध्यमांना याबाबत आवाहन करताना गडकरी यांनी टोल आकारणीबाबत नवे धोरण तयार करण्याचे काम सुरू असून निदान तोपर्यंत नागरिकांना संयम ठेवण्यास सांगितले. तसेच, खारघर येथील टोल आकारणी न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे सुरू करण्यात आल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, शीव- पनवेल महामार्गावरील टोलधाड रद्द न झाल्यास रायगडमधील सर्व रस्ते बंद करू असा इशारा देत शेतकरी कामगार पक्ष(शेकाप) रस्त्यावर उतरला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील, विवेक पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेकापच्या सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांनी कामोठे महामार्गावर आंदोलन केले. या आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेता खारघर टोलनाक्याच्या संरक्षणासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तळोजा लिंकरोडमार्गे वळविण्यात आली होती. आज सकाळी ९.३० वाजल्यापासून टोलनाक्यावरची वसूली बंद करण्यात आल्यामुळे वाहने सुसाट जाताना दिसत होती.
येत्या महिनाभरात देशातील टोल आकारणीबाबत नवे धोरण निश्चित करण्यात येणार असून सर्व महामार्गावर ई-टोल पद्धत सुरू झाल्यावर देशभरात सुमारे ८८ हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा गडकरींनी काही दिवसांपूर्वी केला होता.  
toll2