शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विशेष दोस्ताना’ असलेल्या नितीन गडकरी यांनी त्यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरे यांच्या मनातील इच्छांची लवकरच ‘पूर्ती’ होवो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातील भाजपच्या निर्णयप्रक्रियेत आता नितीन गडकरी अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत.
गडकरी यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी कधीच पटले नाही. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असलेले त्यांचे ‘स्नेहसंबंध’ उद्धव ठाकरे यांना कायमच खटकत राहिले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडकरी यांच्या राजभेटीमुळे शिवसेनेबरोबरचे संबंध अधिकच ताणले गेले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील भाजपची सर्व जबाबदारी दिल्याने शिवसेनेशी समन्वय ठेवण्याचे काम ते करीत असत. पण मुंडे यांच्या निधनानंतर हे काम आता गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आता शिवसेनेची जबाबदारी गडकरी यांच्यावर आल्याने ते आता महाराष्ट्रातील निर्णयप्रक्रियेत अधिक लक्ष घालणार असल्याचे समजते.
शिवसेनेबरोबरचा दुरावा संपविण्यासाठी गडकरी यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. ते ठाकरे यांची भेट घेणार असल्याचीही चर्चा होती. ही भेट लवकरच अपेक्षित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.