बिहारमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असतानाच, भाजपला अस्मान दाखविणाऱ्या नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारून शिवसेनेने मित्र पक्ष भाजपच्या जखमेवर मीठच चोळले आहे.
पाटण्यामध्ये शुक्रवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहावे म्हणून नितीशकुमार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी दूरध्वनी केला होता. नितीशकुमार यांचे निमंत्रण स्वीकारले असून, सुभाष देसाई व अन्य एखादा नेता शपथविधी समारंभाला उपस्थित राहील. तसेच आपण पुढील महिन्यात नितीशकुमार यांची भेट घेऊ, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी भाजप आणि शिवसेनेतील कटुता वाढत चालली आहे.
कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र आले असले तरी नितीशकुमार यांचे निमंत्रण स्वीकारून शिवसेनेने भाजपबद्दलच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असा सूचक इशारा दिला आहे. नितीशकुमार यांनी शपथविधी समारंभाकरिता बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. शिवसेनेला निमंत्रित करून नितीशकुमार यांनी या दोन मित्र पक्षांमधील अंतर वाढविण्यास हातभार लावला आहे.

स्मारकासाठी भाजपची भूमिका महत्त्वाची
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी तिसरा स्मृतिदिन असून, महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची घोषणा व्हावी, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच करावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाढती कटुता तसेच नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारून शिवसेनेने भाजपवर केलेली कुरघोडी लक्षात घेता भाजप नेते शिवसेनेच्या दबावाला बळी पडतात का, हा कळीचा मुद्दा आहे. सरकार टिकविण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा लक्षात घेता मुख्यमंत्री शिवसेनेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या स्मारकाला हिरवा कंदील दर्शवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारीच तशी घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येते.