मुंबई महानगरपालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या माध्यमातून शिवसेना आपले गलिच्छ राजकारण रेटू पाहत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पालिकेने निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्रामध्ये नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानाबाहेरच्या तारा रोड परिसराचाही समावेश आहे. याबद्दल विचारणा केली असता नितेश यांनी म्हटले की, शिवसेनेने आमच्या घरासमोर फेरीवाले बसवले तर मातोश्रीबाहेर फेरीवाले कसे उभे करायचे, ते आम्हालाही माहिती आहे, अशा शब्दांत नितेश यांनी उद्धव यांच्यावर हल्ला चढवला.

‘फेरीवाला क्षेत्रा’च्या विरोधात मनसे

उद्धव ठाकरे हे फेरीवाल्यांच्या माध्यमातून त्यांचे राजकारण रेटू पाहत आहेत. त्यांच्या या गलिच्छ राजकारणाला उत्तर कसे द्यायचे, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे, असे नितेश यांनी सांगितले. दरम्यान काही वेळापूर्वीच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई महानगरपालिकेला फेरीवाला क्षेत्रांची यादी रद्द करण्याचे आदेश दिले. ही यादी नव्याने तयार करण्यात यावी, असे त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

फेरीवाला धोरण प्रक्रिया थांबवण्याची मागणी

याशिवाय, दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील एम. बी. राऊत मार्ग आणि केळुस्कर मार्ग येथे ‘फेरीवाला क्षेत्र’ निश्चित करण्यात आले आहे असून तेथे अनुक्रमे १० आणि २० फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. याविरोधात मनसेकडून एल्गार पुकारण्यात आला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या विभागात पालिकेने निश्चित केलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या आसपासच्या परिसरात जनजागृतीची मोहीम हाती घेतली असून ‘फेरीवाला क्षेत्रा’बाबत नागरिकांडून सूचना आणि हरकती गोळा करून त्या पालिका प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहे.