सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा फटका मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांना बसलाय. यंदाच्या गणेशोत्सवावरही या करोनाचं सावट असणार आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन यंदा गणेशोत्सव मंडळाना कमी उंचीची मुर्ती बसवत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत, मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडळाने यंदा २१ फुटाची गणेश मुर्ती न बसवण्याचा निर्णय घेतलाय. याऐवजी यंदा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी छोट्या मुर्तीची विधिवत पुजा करुन, भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय करुन देण्याचं ठरवलं आहे.

करोना विरुद्धच्या युद्धात गणेशोत्सव मंडळानीही सहभागी व्हावे या मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत हा निर्णय घेतल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षीप्रमाणे होणारे धार्मिक कार्यक्रमही यंदा न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मंडळाचं यंदाचं हे ९३ वे वर्ष असून यावर्षीची वैश्विक महामारीची परिस्थिती लक्षात घेता फक्त वैद्यकीय शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

छोट्या मुर्तीची विधिवत पुजा करुन भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे

 

नवसाला पावणारा गिरगांव चा राजा अशी ख्याती असल्याने भक्तगण दर्शनासाठी येतीलच पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सर्व भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे, मंडळाचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व व्यवस्था सांभाळणार आहेत. यंदा भव्य पाद्यपुजन सोहळा व विसर्जन सोहळ्याचे आयोजन न करता कृत्रिम तलावात राजाचे विसर्जन करून निरोप दिला जाईल असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.