हरकती आणि सूचना मागवून तोडगा, खासगी बसचालक मात्र संपावर ठाम

मुंबई शहरात जड वाहनांवर बंदी घालण्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून पुढील दहा दिवस तरी जड वाहनांवर निर्बंध घालण्यात येणार नाही, असे  वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, लेखी तोडगा हाती येत नाही तोवर र्निबधाच्याविरोधात  १९ व २० सप्टेंबर रोजी पुकारलेला संप मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा खासगी बस मालक संघटनेने घेतला आहे.

मुंबईत वाहनसंख्येत झालेली वाढ आणि ठिकठिकाणी सुरू असलेली प्रकल्पांची कामे यामुळे वाहतूक कोंडी टाळण्याकरिता शहरात अवजड वाहनांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. मोठय़ा वाहनांमुळे रस्त्यावरील जागा जास्त व्यापली जाते आणि वाहतूक कोंडीत भर पडते. म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी खासगी बस आणि अन्य अवजड वाहनांना मुंबईत येण्यासाठी निर्बंध घातले. या संदर्भात शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त आणि खासगी बस मालक संघटना यांची बैठक झाली. त्या वेळी या अधिसूचनेवर हरकती व सूचना घेतल्या जातील आणि त्यानंतरच अंतिम आदेश काढला जाईल, असे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बसमालकांना सांगितले. तर १२ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे सुरुवातीचे दोन दिवस कारवाई झाली. पण ती गोंधळामुळे होती. आता तसे होणार नाही. हरकती व सूचना मागविल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र यावर तोडगा किवा लेखी स्वरूपात काही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बस संघटनेकडून या वेळी घेण्यात आली.

मुंबई वाहतूक पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी अवजड वाहने आणि खासगी बसबाबत अधिसूचना काढल्यानंतर वाहतूक पोलिसांनी निर्बंध न पाळणाऱ्या वाहनचालक व मालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यात चालक-मालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांच्या निर्णयाला विरोध करीत खासगी बसमालक संघटनेने दोन दिवस बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत १३ हजार बसगाडय़ा

एमएमआर क्षेत्रात ३३ हजार बसगाडय़ा असून यातील मुंबई हद्दीत तब्बल १३ हजार बसगाडय़ा आहेत. या बस आंदोलनात बंद ठेवल्या जातील. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई बाहेरून जवळपास एक हजार बस येतात. त्याही आंदोलनात शामील होतील.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या काही महत्त्वाच्या बससेवा

* मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व राज्यातील इतर भागातून – जवळपास ३५० बस

* पुणे ,नाशिक व व जवळच्या अन्य जिल्हय़ातून- १५०

* कर्नाटकमधून- १५०

* हैदराबाद, तेलंगण- ५०

* मध्य प्रदेश- ५०

* गुजरात- १५०

*  राजस्थान – ५०

आयुक्तांनी ही अधिसूचना अंतिम नसल्याचे सांगितले. तसेच, हरकती, सूचना घेण्यात आल्यानंतरच योग्य व अंतिम आदेश काढला जाईल. मात्र, दोन दिवसांपासून खासगी बसवर कारवाई केली जात आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र सध्या कारवाई न करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.

– हर्ष कोटक, मुंबई बसमालक संघटनेचे सरचिटणीस

ही काही अंतिम अधिसूचना नाही. हरकती व सूचना आल्यानंतर निर्बंध घालायचे की नाही ते ठरवू. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

– दत्ता पडसलगीकर (मुंबई पोलीस आयुक्त)