मुंबई : करोना संसर्गाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बंधनकारक करूनही मुखपट्टीचा वापर करीत नसलेल्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही मुखपट्टीचा वापर नागरिक करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यामुळे बेस्ट बसचालक-वाहक, रिक्षा-टॅक्सीचालक यांनाही विनामुखपट्टी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचा अधिकार मिळाला आहे.

इक्बाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टीचा वापर करत नसल्याच्या प्रकाराची या बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली. या संदर्भात व्यापक जनजागृती करावी आणि त्याचसोबत दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करावी, असे आदेश चहल यांनी दिले. मुंबईतील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी मुखपट्टीशिवाय प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक लावावे. त्याचबरोबर सर्व बसगाडय़ा, टॅक्सी, रिक्षा इत्यादींवरही फलक चिकटवून जनजागृती करावी. ‘मुखपट्टी नसल्यास प्रवेश मिळणार नाही’, अशा आशयाचा मजकूर असणारे फलक वाहनांवर लावावेत. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.