वसरेव्यातील धनदांडग्यांची अमरापूरकर यांना शिवीगाळ
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तीव्र दुष्काळ असल्याने यंदाची धुळवड बिनपाण्याने फक्त रंगांची उधळण करून साजरी करण्याचे आवाहन अनेकांनी पाळले असले तरी वसरेव्यातील धनदांडग्यांनी ‘रेनडान्स’ करून हजारो लिटर पाण्याची नासाडी केली. याशिवाय कानठळ्या बसविणारा डीजेचा आवाज बंद करा, पाणी वाया घालवू नका, असे एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहरासोबत सांगायला आलेले ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळही केली. या प्रकरणी वसरेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तीव्र दुष्काळामुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य भेडसावत असल्यामुळे यंदाची होळी पाण्याविना साजरी केली. परंतु, वसरेव्यातील धनदांडग्या रहिवाश्यांपर्यंत मात्र पाणी बचतीचा संदेश पोहोचल्याचे दिसत नव्हते. दुष्काळग्रस्तांशी काही घेणेदेणे नसल्याच्या भूमिकेतून वसरेवा यारी रोड येथील पंचवटी सोसायटीतील रहिवाश्यांनी रंगपंचमीनिमित्त बेधुंद नाचत हजारो लिटर पाणी वाया घालवले. एवढेच नव्हे तर कानठळ्या बसविणारा डीजे तब्बल चार-पाच तास वाजवून डीजेच्या तालावर दुष्काळात रेनडान्स केला. हा कानठळ्या बसविणारा आवाज बंद करा आणि पाणी वाया घालवू नका हे सांगण्यासाठी अमरापूरकर गेले तेव्हा त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली.
सकाळी दहा वाजल्यापासून यारी रोड, वसरेवा येथे आपण राहत असलेल्या इमारतीशेजारील पंचवटी सोसायटीमध्ये प्रचंड कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. तसेच रेनडान्स करून हजारो लिटर पाणी वाया घालविले जात होते. तब्बल चार-पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रचंड आवाजामुळे त्रास होत होता. अशातच मुंबईकरांनी कोरडी होळी साजरी केल्याबाबतच्या चर्चेसाठी एका वृत्तवाहिनीने अमरापूरकर यांना   दूरध्वनी केला. त्यावेळी त्यांनी आपल्या सोसायटीसमोरील प्रकरण संबंधित वृत्तवाहिनीला कथन केले. वृत्तवाहिनींच्या वार्ताहरासह ते तेथे गेले. चित्रीकरण सुरू असल्याचे पाहून पंचवटी सोसायटीतील काहींनी कॅमेरामन तसेच वार्ताहराला मारहाण केली. आपणही त्यांना समजावून सांगत असताना आपल्याला धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आली, असे अमरापूरकर यांनी सांगितले.त्यानंतर अमरापूरकर यांनी वसरेवा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित पंचवटी सोसायटीत घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला आणि त्यानुसार तक्रार दाखल केली आहे.