पुढील काही वर्षांत सरकारमध्ये शिक्षकांच्या फारशा नोकऱ्या निर्माण होणार नाहीत, त्यामुळे पाच-दहा लाख रुपये भरून डीएड-बीएडला प्रवेश घेऊन भविष्यात शिक्षकाची नोकरी मिळेल, या भ्रमात राहू नका, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीच विधानसभेत बोलताना दिला! पूर्व प्राथमिक प्रवेशांसाठी नियमन करण्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शाळा व शिक्षणाच्या परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, दिलीप वळसे-पाटील आदींनी विरोधी पक्षातर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेसाठी दिला होता. त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना तावडे यांनी अनेक बाबींचा उहापोह केला. डीएड, बीएडची महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांच्या उपलब्ध नोकऱ्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. सरकारला अतिरिक्त शिक्षकांचेच समायोजन करावे लागत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची आशा धरून या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे तावडे यांनी सांगितले. आदिवासी, डोंगरी विभागात १० विद्यार्थी असतील, तरीही शाळा सुरु ठेवण्याचे धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळाबाह्य़ मुलांच्या शिक्षणासाठी गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ आदी राज्यांत रोजगारासाठी आपल्या पालकांबरोबर जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठीही त्या राज्यांच्या मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करुन व्यवस्था करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.