संदीप आचार्य 
मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. जवळपास २० ते २४ हजार नवीन करोना रुग्ण आढळत असून यातील गंभीर रुग्णांना करोना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना यापुढे उपचारासाठी ‘करोना केअर सेंटर’ ( सीसीसी) मध्ये किंवा घरीच उपचाराखाली ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे. सौम्य करोना रुग्णांना यापुढे करोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात ( डिसीजन) बेड न देण्याची निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आजघडीला ११ लाख ६७ हजार रुग्णसंख्या असून गेले चार दिवस रोज ४०० हून अधिक रुग्ण दगावत आहेत. रोजच्या रोज २० ते २४ हजार रुग्ण वाढत असून आजच्या दिवशी तीन लाखाहून अधिक अॅक्टव्ह रुग्ण म्हणजे उपचारासाठी दाखल करावे लागणारे रुग्ण आहेत. करोना रुग्ण आणि रुग्णालयातील बेड यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त झाले असून करोना रुग्णांसाठी आज शासकीय तसेच आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही बेड मिळणे कठीण झाले आहे.

पुणे शहरात सर्व रुग्णालयात मिळून सुमारे साडेपाच हजार बेड करोना रुग्णांसाठी राखीव आहे तर आयसीयूत अडीच हजार बेड उपलब्ध आहेत. जवळपास साडेसातशे बेड व्हेंटिलेटर चे असून करोना रुग्णांची संख्या ही दुपटीहून अधिक असल्याने रुग्णांचे बेड साठी अतोनात हाल होताना दिसतात. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिकसह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात करोना रुग्णांना ऑक्सिजन बेड वा अतिदक्षता विभागात बेड मिळणे कठीण झाले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे बहुतेक खासगी रुग्णालयात तसेच शासकीय व्यवस्थेतही सौम्य लक्षणे असलेले करोना रुग्ण घाबरुन दाखल होत असल्यामुळे गंभीर रुग्णांना आज अतिदक्षता विभागात तसेच ऑक्सिजन असलेले बेड मिळवताना अनेक कसरती कराव्या लागत आहेत. परिणामी वेळेत गरजू व गंभीर करोना रुग्णांचा बेड अभावी मृत्यू होत असल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आज संबंधितांची बैठक घेऊन सौम्य लक्षणे असलेले करोना रुग्ण पन्नाशीच्या आतील असतील तसेच कोमॉर्बीड म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार नसतील तर त्यांना घरीच क्वारंटाइन करावे किंवा करोना उपचार केंद्रात दाखल करावे असा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यात करोनासाठी नियोजित नसलेल्या रुग्णालयात परस्पर दाखल केले जाते तसेच त्याची माहितीही यंत्रणेला देणे बंधनकारक असताना दिली जात नाही. अशा रुग्णालयांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन यांना देण्यात आले आहेत.

‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट’ खाली या रुग्णालयांची परवाने रद्द करण्यास डॉ. व्यास यांनी सांगितले आहे. या करोना रुग्णांमध्ये डायलिसीसची गरज असलेल्या करोना रुग्णांची संख्या मोठी असून याबाबतचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार तातडीने डायलिसीस मशिन खरेदी करण्यासही डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना सांगितले.