करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमधून दाखले वेळेत मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ११ वी प्रवेशाच्या वेळी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायवाड यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले असून, प्रवेशासाठी जातीच्या दाखल्याची अट शिथिल करून शाळेचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा, तसेच ज्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र लागते त्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी एक वर्ष वाढीव मुदत देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखल सादर करणे बंधनकारक आहे. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्याची प्रशासकीय यंत्रणा ही सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात गुंतलेली आहे. त्यामुळे नॉनक्रिमीलेअर, जातीचे दाखले मिळणे कठीण होऊन बसले आहे. ही प्रमाणपत्रे तीन महिन्यांत सादर केली नाहीत, तर विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांवर अशी वेळ ओढवू नये यासाठी जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला तात्पुरता ग्राह्य़ मानून राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.