राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ‘युती’मुळे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने आता राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीच्या तख्ताशी नेहमीच जुळवून घेण्याच्या शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या राजकारणानुसारच राष्ट्रवादी भाजपच्या अधिक जवळ जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या ठरावावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील ‘युती’ अधोरेखित झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादीने मांडलेला अविश्वासाचा ठराव ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर झाला. ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादीचे २७, भाजपचे १२ आणि सहा अपक्षांनी मतदान केले. भाजपच्या पाठिंब्याशिवाय ठराव मंजूर होणे शक्यच नव्हते. सभागृहात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली असताना शिवसेनेने तटस्थ राहत राष्ट्रवादी-भाजप युतीच्या विरोधात भूमिका मांडली. ‘‘भाजप आणि आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत, पण भाजपचे राष्ट्रवादीशी सूत जमले आहे. यातून भाजपने आमची फसवणूकच केली,’’ असा आरोप शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चर्चेत सहभागी होताना केला. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचे स्पष्ट झाले. या अविश्वासाच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप असे राजकीय चित्र पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीला मदत करून भाजपने शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. गडबड केल्यास प्रसंगी राष्ट्रवादीची मदत होऊ शकते, असे शिवसेनेला खुणावले आहे. अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद वगळता काँग्रेसकडे आता राज्यात कोणतेच वैधानिक महत्त्वाचे पद उरलेले नाही.
अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने राष्ट्रवादीला राजकीय लाभही होणार आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी अधिक ताकदवान पक्ष आहे हा संदेश बाहेर गेला आहे. काँग्रेसची पार पीछेहाट होत असताना पक्षातील नाराजांना राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. तसेच भाजपशी जवळीक साधून राष्ट्रवादीचे नेते आपल्याला हवी तशी कामे करून घेतील व आपली मतपेढी सुरक्षित राहील याची खबरदारी घेतील, असा सूत्रांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वाढणे केव्हाही सत्ताधारी भाजपसाठी फायद्याचे आहे, कारण काँग्रेस वाढल्यास त्याचा भाजपला फटका बसू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांचे कौतुक करणे, यापाठोपाठ राज्यातील भाजपच्या नेत्यांची इच्छा नसतानाही राष्ट्रवादीला मदत करण्याचा दिल्लीचा आदेश हे सारे भविष्यात राजकीय संदर्भ बदलण्याचे संकेत मानले जातात. राष्ट्रवादी लवकरच एन.डी.ए.मध्ये सामील होण्याची चर्चा आहे.

छुपा समझोता नाही – मुख्यमंत्री
अविश्वास ठरावावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपा समझोता झालेला नाही वा राजकारणाचा भागही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सभापतीपदाच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ असे नाही, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे भांडण ही नित्याचीच बाब असून प्रत्येक जण संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर वार करीतच असतात. मात्र आमच्या भांडणात भाजपने पडण्याची गरजच नव्हती. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात एकमेकांना गदा लागली तरी चालले असते. परंतु या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नसतानाही त्याने तो का मारला. – शिवाजीराव देशमुख, सभापती विधान परिषद

राष्ट्रवादीने मांडलेला अविश्वासाचा ठराव ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर झाला. ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादीचे २७, भाजपचे १२ आणि सहा अपक्षांनी मतदान केले. भाजपच्या पाठिंब्याशिवाय ठराव मंजूर होणे शक्यच नव्हते.