करोनाचं संकट हाताळताना आम्हाला कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका करायची नाही. उलट सरकारला आमचा पाठिंबा आहे. परंतु कोणताही निर्णय घेताना मंत्र्यांमध्ये समन्वय हवा आहे. पण, दुर्दैवानं समन्वय दिसत नाही, असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

राज्यातील करोनाची स्थिती आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता डॉट कॉमला सविस्तर मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरेही दिली. ही मुलाखत गुरुवारी सकाळी ९ वाजता लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का? या संकटाच्या वेळीही राज्य सरकार मतांचं राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.