News Flash

मृतदेहांची करोना चाचणी नाही

करोना साथीच्या उद्रेकामध्ये फक्त न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन

मृतदेहांची करोना चाचणी नाही
(संग्रहित छायाचित्र)

मृतदेहाची करोना चाचणी करण्याबाबत अनेक संभ्रम असल्याने इथून पुढे केवळ न्यायवैद्यक प्रकरणे वगळता मृतदेहांचे नमुने चाचणीसाठी न घेण्याचे आदेश राज्य सरकारने जाहीर केले आहेत.

करोना साथीच्या उद्रेकामध्ये फक्त न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन करावे. अन्य मृतदेहाची बाह्य़तपासणी, रुग्णांची माहिती, इतर आजार, मृत्यूच्या आधीची वैद्यकीय स्थिती यावरून मृत्यूचे कारण देण्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केले आहे. परंतु यात मृतदेहाची करोना चाचणी करावी का याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण होत होते.

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा मृतदेह असल्यास किंवा करोनाची लक्षणे असल्यास काही रुग्णालयांमध्ये चाचण्या केल्या जात होत्या. परंतु यांचे अहवाल येईपर्यत मृतदेह रुग्णालयाच्या ताब्यात असल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत होते. यामुळे मृतदेह उशीरा प्राप्त होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. तसेच मृत्यूचे कारण देण्यासही वैद्यकीय अधिकारी तयार होत नसल्याने काही वेळेस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत असत. अशावेळेस संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने चाचणी करण्याचा आग्रह शवविच्छेदन विभागाकडून केला जात असे, असे पालिका रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी स्पष्ट केले. मृतदेहाच्या चाचण्यांबाबतचा संभ्रम दूर करत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. केवळ न्यायवैद्यक प्रकरणे सोडता मृतांची करोना चाचणी करू नये, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:48 am

Web Title: no corona test of the bodies abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शब्दप्रभू गुरू ठाकूर यांच्याशी गीतगप्पा
2 बेदरकार वाहनांवर ‘अंतर-वेळ गुणोत्तरा’चा लगाम
3 चार लाख घरकामगार वाऱ्यावर
Just Now!
X